ऑटोमोबाईल उद्योगात १० टक्क्यांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 02:45 PM2020-10-03T14:45:40+5:302020-10-03T14:46:13+5:30
अनलॉकनंतर मात्र औरंगाबादच्या उद्योगांनी बऱ्यापैकी झेप घेतली आहे. यामध्ये बजाज ऑटो कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७ ते १० टक्के अधिक उत्पादन घेतले आहे, हे विशेष.
औरंगाबाद : चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे उद्योगांची घडी विसकटलेली असली तर अनलॉकनंतर मात्र औरंगाबादच्या उद्योगांनी बऱ्यापैकी झेप घेतली आहे. यामध्ये बजाज ऑटो कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७ ते १० टक्के अधिक उत्पादन घेतले आहे, हे विशेष.
कोरोनामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत अमूलाग्र बदल होत आहे. वैयक्तिक वाहनांचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठा व निर्यातीमध्ये बजाज ऑटोच्या दुचाकींची गत वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली दिसून येत असल्याचे सीएमआयएचे सचिव लोणीकर यांनी सांगितले. सध्या औरंगाबादचे उद्योग ७५ टक्के उत्पादन क्षमतेने सुरू आहेत. व्हेंडर्स आणि लघु उद्योजकांनीही आता गती घेतली आहे. परप्रांतीय कामगार अजूनही वापस न आल्याने उद्योग नगरीला लवकरच कुशल कामगारांची कमतरता जाणवणार आहे. यंदा पाऊसपाणी चांगले असल्याने पुढील दोन महिने तरी उद्योगांसाठी चांगले असणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की लॉकडाऊनदरम्यान उद्योगांचे अर्थचक्र कोलमडले आहे. दि. १ सप्टेंबरपासून उद्योगांना बँकांचे हप्ते भरावे लागत आहेत. यामध्ये सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची आर्थिक कोंडी होत आहे. आता हे उद्योग सुरू असले तरी जवळपास ९० दिवसांनंतर त्यांच्या हातात पैसा येईल, त्यामुळे शासन यावर काही तरी मार्ग काढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.