आष्टी येथे १० जणांना खिचडीतून झाली विषबाधा
By Admin | Published: November 13, 2016 12:33 AM2016-11-13T00:33:26+5:302016-11-13T00:37:42+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील एका धार्मिक कार्यक्रमात १० जणांना शनिवारी खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील एका धार्मिक कार्यक्रमात १० जणांना शनिवारी खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असून, यापैकी ४ जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आष्टी येथे एका समाजाची पारडगाव आणि बदनापूर येथील संयुक्त जमात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून येथील प्रार्थनास्थळामध्ये आलेली आहे. धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य करत होती. मात्र शनिवारी दुपारच्या जेवणात या जमातीने स्वत: खिचडी तयार करुन दुपारचे जेवणात खिचडी खालली. मात्र यातील अनेकांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. यामध्ये शरीफ शब्बीर तांबोळी, शे. सोहेल शे. फारुक, शे. खालेद शे. रशीद, शे. शरीफ शे. बुऱ्हान, स. नासेर स. मुसा सोहेब अहेमद शेख, जावेद असीफ पठाण, हाफेज अन्सार यांना विषबाधा झाली होती. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी योगेश राठोड हे यावेळी उपस्थित नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर औषधी निर्माता उबरहंडे यांनी गावातील खाजगी डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले.
यामध्ये डॉ. सावराम गायकवाड, डॉ. जगन्नाथ बरसाले, डॉ. केशव सोळंके यांच्यासह येथील कर्मचाऱ्यांनी विषबाधीत रुग्णांवर उपचार केले. मात्र यापैकी शे. शरीफ तांबोळीसह ४ जणांना त्रास जास्त होत असल्याने त्यांना परतूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, सर्व रूग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले. अचानक झालेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.