पावसाचे १०% पाणी जमिनीत
By Admin | Published: May 25, 2016 11:49 PM2016-05-25T23:49:49+5:302016-05-26T00:04:31+5:30
औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे.
औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे. औरंगाबादेत दरवर्षी होणाऱ्या सरासरी ७०० मि. मी. पावसापैकी फक्त १० टक्केच पाणी जमिनीत जाते. चेन्नई शहराप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आल्यावरच परिस्थितीत सुधारणा होईल. अन्यथा शहर बकाल होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा भूजलशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांनी दिला.
महापालिकेतर्फे बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, प्रभारी सहायक संचालक नगररचना वसंत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना अशोक तेजनकर यांनी सांगितले की, चेन्नई शहराला आंध्र प्रदेशातून पाणी न्यावे लागत होते. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीची केली. अवघ्या काही वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला. औरंगाबादेतही असाच कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांच्या विधानाला महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाठिंबा दर्शविला. जलस्तर ३००-४०० फूट खोल गेला आहे. औरंगाबाद शहरातील ३० टक्के नागरिक या भूजलाचा वापर करतात. हे पाणी बंद झाल्यास महापालिकेला प्रत्येक नागरिकाला पाणी देणे अवघड होऊन जाईल. शहरात १५४ विहिरी मनपाच्या आहेत. त्यातील ९१ विहिरींना चांगले पाणी आहे. ते शुद्ध करून वापरता येऊ शकते. अनेक विहिरींचे पुनर्भरण करावे लागेल. आर्किटेक्ट असोसिएशनचे योगेंद्र बल्लाळ, स्वयंसेवी संस्थेच्या मीनल नाईक, सुकुमार कुलकर्णी, श्रीरंग फरकाडे यांनीही मार्गदर्शन केले. मीनल नाईक यांनी कायमस्वरूपी समिती नेमण्याची सूचना केली. महापौरांनी त्याला सहमती दर्शविली. सूत्रसंचालन वसंत निकम यांनी तर आभार उपायुक्त अय्युब खान यांनी मानले.