सिल्लोड तालुक्यात १० संवेदनशील, ५ अतिसंवेदनशील गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:05 AM2021-01-15T04:05:32+5:302021-01-15T04:05:32+5:30
श्यामकुमार पुरे सिल्लोड : तालुक्यातील केळगाव, वांगी बु , पिंपळगाव पेठ, बोरगाव सारवणी, भवन, पालोद, आमठाणा, शिवना, तांडाबाजार, कायगाव ...
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यातील केळगाव, वांगी बु , पिंपळगाव पेठ, बोरगाव सारवणी, भवन, पालोद, आमठाणा, शिवना, तांडाबाजार, कायगाव ही १० गावे संवेदनशील, तर अंधारी, भराडी, घटनांद्रा, डोंगरगाव, अजिंठा ही ५ गावे अति संवेदनशील आहे. या गावांमधील मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस व प्रशासनाची यावर करडी नजर राहणार आहे. अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत व पोलीस प्रशासनाने दिली.
शुक्रवारी, १५ जानेवारीला होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ७७ ग्रामपंचायतींसाठी ३३६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ८३ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. यात सहा ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक घेतली. त्यामुळे एकूण ७७ ग्रामपंचायतींसाठी आता मतदान होत आहे. ७७ ग्रामपंचायतींच्या ६६० जागांसाठी १ हजार ५०९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
३३६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून यासाठी १ हजार ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रावर ४ कर्मचारी राहणार आहेत. मतदान यंत्र तसेच कर्मचाऱ्यांसाठी ५९ वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रांवर थर्मल गनने आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी ४०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी, एक सहायक पोलीस निरीक्षक, ५ सहायक पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक, २५३ पोलीस कर्मचारी, १७० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्त बजावणार आहेत.
मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे, तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे, विनोद करमनकर यांनी केले आहे.
-------------
कठोर कार्यवाही करणार...
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान सर्वांनी शांततेत मतदान करून घ्यावे. यावेळी बोगस मतदान करणे, विनाकारण मतदान केंद्रावर गोंधळ घालणे, तणाव निर्माण करणे किंवा इतर काही गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
--------
एकूण महिला मतदार : ८५,४१४
एकूण पुरुष मतदार : ९७,२१२
एकूण मतदान : १,८२,६२६
एकूण प्रभाग : २९३
मतदान केंद्रे : ३३६
मतदान यंत्र : BU :- 827, CU : 414 एकूण 1241
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : 77
रिंगणात असलेले उमेदवार : १५०९
बिनविरोध ग्रामपंचायती : 6
फोटो : सिल्लोड येथे ईव्हीएमच्या सिलिंगची प्रक्रिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिल्लोड येथे पार पडली. यावेळी पाहणी करताना परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे दिसत आहे.
2) सिल्लोड येथील आयटीआयमधून मतदान यंत्र निवडणूक बुथवर घेऊन जाताना कर्मचारी दिसत आहे.
(छाया:- श्यामकुमार पुरे, सिल्लोड)