गंगापूर उपसा सिंचन योजनेतून १० हजार हेक्टर क्षेत्र होणार सुजलाम् सुफलाम्
By बापू सोळुंके | Published: January 6, 2024 06:27 PM2024-01-06T18:27:19+5:302024-01-06T18:30:02+5:30
दोन टप्प्यात पुढील तीन वर्षांत या योजनेचे काम पूर्ण होईल.
छत्रपती संभाजीनगर : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे जायकवाडी जलाशयाच्या काठावर असूनही सुविधेअभावी मागील ४५ वर्षांपासून गंगापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची जमीन पाण्याअभावी सिंचनापासून वंचित होती. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने मंजूर केलेल्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचा खर्च २०० कोटी रुपयांनी वाढून ६९३ कोटी रुपये झाला. या खर्चाला मंजुरी देत राज्य सरकार आता या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. या योजनेतून गंगापूर तालुक्यातील दहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दोन टप्प्यात पुढील तीन वर्षांत या योजनेचे काम पूर्ण होईल.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पासाठी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत. असे असूनही गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या धरणाचा विशेष असा लाभ आतापर्यंत झाला नाही. जायकवाडी धरणाच्या जलाशयाच्या डाव्या बाजूला जुने लखमापूर गावठाणालगत पंपगृह बांधून उपसा सिंचन योजना राबवावी. यातून गंगापूर तालुक्यातील ४० गावांतील शेतजमीन ओलिताखाली आणण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. सन २०१६-१७ मध्ये गंगापूर उपसा सिंचन योजनेला शासनाने तत्त्वत: मंजुरी देत ४२६ कोटी रुपये मंजूर केले होते. याकरिता ५५ दलघमी मंजूर करण्यात आले. विविध प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी उलटला आणि या योजनेचा खर्च तब्बल दोनशे कोटींनी वाढला. या योजनेला गतवर्षी १२ जुलै रोजी ६९२ कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने या योजनेची दोन टप्प्यात अंमलबजावणी केली जात आहे. याकरिता नुकतीच निविदाप्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दोन टप्प्यात होणार योजनेचे काम :
गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४५०० हेक्टर, तर दुसऱ्या टप्प्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पहिल्या वर्षात ही होणार कामे :
पहिल्या टप्प्यात पंपगृह १, ऊर्ध्व नलिका टप्पा १, वितरण कुंड १ आणि बंद नलिका वितरणप्रणालीचे काम केले जाईल. यातून सुमारे साडेचार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. याकरिता २४० कोटी उपलब्ध करण्यात येतील.
दुसऱ्या वर्षी काय होणार?
बंद नलिका वितर प्रणाली व उर्वरित कामे हाती घेण्यात येतील. यातून सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल. या कामासाठी २४० कोटींचा निधी महामंडळाला मिळेल.
तिसऱ्या वर्षीही कामे होतील :
पंपगृह क्रमांक २, उद्धरण नलिका, वितरण कुंड क्रमांक २ चे काम पूर्ण केले जाईल. या कामामुळे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. या कामासाठी ५६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध होईल.
उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन?
गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबईत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.