राज्यात १० हजार पिंक रिक्षा येणार; पण आधीच्या कुठे? महिला सक्षमीकरण कागदावरच
By संतोष हिरेमठ | Published: July 4, 2024 11:49 AM2024-07-04T11:49:56+5:302024-07-04T11:51:06+5:30
शहरातून गुलाबी रिक्षा गायब, काहीनी कलर बदलून केली रिक्षांची विक्री, काही पुरुषांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्पात १० हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी पिंक ई-रिक्षा देण्याची योजना जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पिंक रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र, या रिक्षा रस्त्यांवरून गायब झाल्या. या रिक्षांचा कलर बदलून पुरुष चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या, तर काहींनी कलर बदलून या रिक्षांची थेट विक्री करून टाकली.
आरटीओ कार्यालयाकडून २०१७ मध्ये महिलांसाठी विशेष अशा गुलाबी रंगाच्या रिक्षांचे ३७ परवाने देण्यात आले. या रिक्षा फक्त महिलांसाठीच असतील म्हणजे चालक महिला राहतील आणि केवळ महिला प्रवाशांची वाहतूक होईल, असे सांगण्यात आले. पुढे परवानाधारक महिला अथवा तिच्या पतीस ही रिक्षा चालविण्याची मुभा असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अगदी सुरुवातीपासूनच गुलाबी रिक्षा चालविणाऱ्या महिला शहरात दिसल्याच नाहीत. गुलाबी रिक्षा पुरुषच चालविताना दिसत असे. आता तर गुलाबी रिक्षा शोधूनही सापडत नाही.
जिल्ह्यातील एकूण रिक्षा-३२,०००
परवाने दिलेल्या पिंक रिक्षा- ३७
नवीन योजना काय?
-महिलांना स्वयंरोजगारासाठी पिंक ई-रिक्षा.
- राज्यातील १७ शहरांमध्ये योजना राबविणार.
- १० हजार महिला या रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय.
- योजनेसाठी ८० कोटी रुपयांचा निधी.
आधीच्या गुलाबी रिक्षांचा शोध घ्यावा
नव्या पिंक ई-रिक्षाची योजना आणली; परंतु आधीच्या गुलाबी रिक्षांचा शोध घेतला पाहिजे. या रिक्षांचा रंग बदलून विक्री केली. आधी या रिक्षांचा हिशेब घेतला पाहिजे. सर्वसामान्य रिक्षाचालकांसाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ