१० टन लसूण लुटल्याचा बनाव उघड; अवघ्या ६ तासांत चालक- क्लिनरसह सहाजण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 07:17 PM2023-08-26T19:17:53+5:302023-08-26T19:19:17+5:30
अजिंठा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बनाव उघडकीस आणत आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.
सिल्लोड: ९ लाख रुपये किमतीच्या लसणासह ट्रक चोरीस गेल्याची तक्रार करणारेच आरोपी असल्याचे अवघ्या सहा तासांच्या तपासात पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकरणी चालक, वाहकसह ६ आरोपींना अजिंठा पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून ९ लाख रुपयांचा १० टन लसून, ट्रक आणि एक कार असा ३७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. आज दुपारी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील इंदोर येथील व्यापारी सुरेंद्र साधवानी यांनी सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा १० टन लसूण ट्रकमधून ( एम एच १८ बिजी ८४६५ ) कर्नाटक येथे रवाना केला. मात्र, ट्रक चालक भोलूखान अजित खान, क्लिनर जितेंद्र चिंतामण गोलकर यांनी लसणाने भरलेला ट्रक बाळापूरजवळ चोरीस गेल्याची तक्रार अजिंठा पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता दिली. एका कारने रस्ता अडवून मारहाण करत ट्रक पळवल्याची माहिती दोघांनी दिली. मात्र, पोलिसांना यात काळेबेरे आढळून आले. उलट तपासणी केली असता इतर चार लोकांच्या मदतीने चालकाने व क्लिनरनेच ही लूट केल्याचे समोर आले. पोलिसांनी चालक भोलूखान अजित खान ( रा.खडकवणी जिल्हा खरंगोंन) , क्लिनर जितेंद्र चिंतामण गोलकर ( रा.आंबडोचर जि. खरंगोन ) यांनी दिलेल्या माहितीवरून सद्दाम खान रशीद खान, शाहरुख रशीद खान, घनशाम सोनी, रिजवान खान यांना एका ट्रकसह जळगाव येथून जेरबंद केले. मुद्देमाल धुळे आणि जळगाव येथून जप्त करण्यात आला.
ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलावनिया,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सिल्लोड विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुनील लांजेवार यांच्या मार्गर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे,पोहेकॉ अक्रम पठाण,संदीप कोथलकर,सांडू जाधव,भागवत शेळके,विकास लोखंडे,संजय कोळी यांनी केली.
असा रचला चोरीचा बनाव
दोन्ही चालक व क्लिनर यांनी खरगोन येथील सद्दाम खान रशीदखान व शारुख रशीद खान यांच्याशी हात मिळवणी केली. फरदापुर येथील हॉटेल मेवातवर ट्रक कुठे लुटायची ठरवले. त्यानुसार बाळापूर जवळील पुलावर ट्रक लुटल्याचा बनाव केला. त्यानंतर ट्रक जळगावकडे पाठवून चालक आणि क्लिनर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आले.