१0 वर्षांत ‘डीएमआयसी’ औद्योगिक शहर नावारूपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:32 AM2018-08-31T00:32:25+5:302018-08-31T00:33:22+5:30
औरंगाबादेत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेंद्रा, बिडकीन येथे दोन मोठ्या कंपन्यांकडून विकास करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी कामे होत असून, २०१९ पर्यंत पायाभूत सुविधा उभ्या राहतील. उद्योगांना केंद्रित ठेवून सुविधा दिल्या जात असून, आगामी दहा वर्षांत ‘डीएमआयसी’ हे औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येईल,असा विश्वास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादेत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेंद्रा, बिडकीन येथे दोन मोठ्या कंपन्यांकडून विकास करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी कामे होत असून, २०१९ पर्यंत पायाभूत सुविधा उभ्या राहतील. उद्योगांना केंद्रित ठेवून सुविधा दिल्या जात असून, आगामी दहा वर्षांत ‘डीएमआयसी’ हे औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येईल,असा विश्वास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी व्यक्त केला.
‘लोकमत कॉफी टेबल’ या उपक्रमात सोहम वायाळ यांनी बुधवारी (दि.२९) लोकमत भवन येथे संपादकीय सहकाºयांशी मनमोकळा संवाद साधला. ‘एमआयडीसी’च्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात जालना टप्पा-१, टप्पा-२, टप्पा-३ हे क्षेत्र आहेत. बीड जिल्ह्यात बीड, माजलगाव हे क्षेत्र येतात. ‘एमआयडीसी’ ही स्वत: प्लॅनिंग अॅथारिटी आहे. भूखंडांमध्ये इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे प्रमाण निश्चित केले जाते. एमआयडीसी काळानुरूप
भूमिका बदलत असल्यामुळे अनेक चांगले बदल झाले आहेत,असे ते म्हणाले.
उद्योगांचा वाढता कल
सोहम वायाळ म्हणाले, ‘डीएमआयसी’ अंतर्गत गेल्या काही महिन्यांत १ ते १० एकरपर्यंत भूखंड वाटप झालेले आहेत. भूखंड घेतलेल्यांनी ताबा घेऊन प्लॅन मंजूर करून घेतले. कंपन्यांनी कामेदेखील सुरूकेली आहेत. पूर्वी प्रतिसाद कमी होता; परंतु आता येथे होणारा विकास निदर्शनास पडत आहे. त्यामुळे उद्योगांचा कल वाढत आहे. आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत पहिली आणि मोठी गुंतवणूक असलेल्या ‘ह्योसंग ग्रुप ‘अँकर’ गुंतवणूकदार ठरले आहेत. या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
अनेक योजना यशस्वी
सोहम वायाळ म्हणाले, तहसीलदार असताना जिवंत सातबारा मोहीम, ‘बाबा जहर खाऊ नका’, राजीव गांधी प्रशासन गतिमानता अभियान योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. ‘बाबा जहर खाऊ नका’ या कवितेच्या माध्यमातून शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वाळूज औद्योगिक वसाहतीत रस्त्यासह पायाभूत सुविधा चांगल्या दिल्या आहेत. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या कामासंदर्भात मनपा आणि एमआयडीसीतील चर्चा सुरूआहे. औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या प्रत्येक महिन्याला बैठका घेऊन समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे.
असा घडलो मी...
सोहम वायाळ म्हणाले, आरेगाव (ता. मेहकर, जि. बुलडाणा) या २ हजार लोकसंख्येच्या गावातील मी रहिवासी आहे. वडील प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक. प्राध्यापक असलेले मोठे बंधू माझे आदर्श,गुरूअसून त्यांच्यामुळे मी घडलो. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. ८ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण आरेगावपासून ५ कि.मी. वरील डोणगाव येथे झाले. वडिलांची ४ आणि काकांची ४ एकर जमीन होती. वडील सांगायचे, तुम्ही शाळा शिकले, मोठे झाले, काही केले तर ८ एकरचे ८० एकर करताल. अन्यथा ८ एकर सोबत आयुष्यभर गावात जगावे लागेल. तुमच्यात धमक असेल तर तुमच्या हिमतीवर करा, वारसा म्हणून मी काही देऊ शकत नाही. त्यामुळे डी.एड. करून शिक्षक व्हायचा निश्चिय केला. डी. एड. सुरूअसतानाच पदवी पूर्ण केली. एकदा आत्याभावाला भेटलो, तेव्हा येऊन जाऊन जि. प. शिक्षक, दुसरे काही तरी बना,असे त्यांनी म्हटले. त्यामुळे औरंगाबादला आलो. ‘एमपीएससी’चा क्लास लावला. पैठणगेट येथील दहा बाय दहाच्या रूममध्ये तिघे जण राहत होतो. जवळपास ८ महिने क्लास केला. त्यानंतर हिंगोलीत शिक्षक म्हणून रुजू झालो.
लँड बँक संकल्पना
वाळूजला जमिनीची सर्वाधिक मागणी आहे; परंतु येथे जमीनच शिल्लक नाही. येथे नवीन भूसंपादन करून जमीन विकणे अशक्य आहे. पैठण, कन्नडला जायला कोणी तयार नाहीत; परंतु एक दिवस बाहेर निघावेच लागेल. लँड बँक म्हणून सर्वात जास्त २ हजार एकर जमीन ‘डीएमआयसी’अंतर्गत स्थापन केलेल्या आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीसाठी आहे. एखादी कंपनी आली की,लगेच जमीन उपलब्ध करून देता येऊ शकते. त्यानंतर बिडकीन, माजलगाव येथे जमीन उपलब्ध असून, कन्नड येथे ३९७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. उद्योगांसाठी औरंगाबाद परिसरात १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे.
पाया जेवढा पक्का तेवढे यश
अंबाळा तांडा येथील एक शिक्षकी शाळेवर नोकरी करताना विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबर एमपीएससीचा अभ्यास केला. प्री परीक्षा पास झालो. मेन परीक्षा पास झालो. त्यानंतर मुलाखतीची तयारी करताना वेगळाच अनुभव आला. बुट कसा पाहिजे, कपडे कसे पाहिजे,याचा विचार क रावा लागत होता. इतरांपेक्षा राहणीमान वेगळे असल्याने निराशा वाटली होती; परंतु आत्मविश्वासामुळे निवड झाली. ‘तुम्ही किती तास अभ्यास केला, क्लास कुठे लावला’ अशी विचारणा केली जाते; परंतु यापेक्षा ‘बारावीपर्यंतचा तुमचा पाया कसा घडला’ हे अधिक महत्त्वाचे आहे. हा पाया जेवढा पक्का तेवढे यश मिळते. तहसीलदार म्हणून पहिली पोस्टिंग रिसोडला मिळाली. ज्या तालुक्यात शिक्षक होतो, तेथूनच सुरुवात झाली. २०१२ मध्ये उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली, तर गेल्या चार वर्षांपासून ‘एमआयडीसी’त प्रादेशिक अधिकारीपदी कार्यरत आहे.
४४शब्दांकन : संतोष हिरेमठ