घाटीत १०० खाटांचे वातानुकूलित नर्सिंग होम, 'ऑपरेशन कॉम्प्लेक्स थिएटर'चा देखील प्रस्ताव
By सुमित डोळे | Published: March 16, 2024 12:55 PM2024-03-16T12:55:17+5:302024-03-16T12:56:09+5:30
आमागी बदलांसाठी टास्क फोर्सची स्थापना, दरमहा बैठक होणार
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात जुन्या ५ व ६ क्रमांकाची वॉर्ड इमारत पाडून तेथे लवकरच १०० खाटांचे नर्सिंग होम उभारले जाणार आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे वातानुकूलित व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध असतील. शिवाय, कर्करोगापासून ते डोळ्यापर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया एकाच इमारतीमध्ये होतील, असे ‘ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स’ तयार केले जाणार आहे. शुक्रवारी घाटीच्या नवनियुक्त टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
६० वर्षांपूर्वी उभारलेल्या घाटी रुग्णालयातील बहुतांश इमारती जीर्ण झाल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने डॉक्टर, प्रशासनावर मोठा ताण वाढत आहे. अस्वच्छता, अपघात, निधीचा अभाव, अपुरे मनुष्यबळ यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जागेची बरीच कमतरता आहे. याबाबत परिणामकारक तोडगा काढण्यासाठी टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली. पहिल्या बैठकीत तीन निर्णयांवर चर्चा होऊन त्याच्या अंगमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील. दर महिन्याला या समितीची आढावा बैठक पार पडेल.
...अशी असेल समिती
डॉ. सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. शिराज बेग, डॉ. भारत सोनवणे, डॉ. काशीनाथ गर्कळ, डॉ. वर्षा रोटे, डॉ. श्रिनिवास गडप्पा, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. एम.बी. लिंगायत, डॉ. अर्चना वरे, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. विनोद मुंदडा यांचे सदस्य असतील.
हे बदल अपेक्षित, मंजुरीची प्रतीक्षा
-नेफ्रोलॉजी विभाग ‘ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स’मध्ये रूपांतरित होईल. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया एकाच इमारतीमध्ये होतील. या इमारतीशेजारीच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांवर उपचारांसाठी मेडिसिन औषधवैद्यकशास्त्र इमारत असेल. दोन्हींमध्ये ओव्हरब्रीज असेल. घाटीमध्ये हा पहिलाच प्रयोग असेल.
-तीन मजली १०० बेडचे अद्ययावत, वातानुकूलित नर्सिंग होम असेल, जेणेकरून शासकीय योजनांसाठी खासगी रुग्णालयात जाणारा वर्ग घाटीकडे वळेल.
-रक्तपेढी विभागाकरिता एक स्वतंत्र इमारत उभारली जाणार.