औरंगाबाद शहरातील ३० मार्गांवर धावणार १०० बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:18 AM2018-11-17T00:18:26+5:302018-11-17T00:18:55+5:30

शहर बस लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दीर्घ चर्चा केली. चर्चेत शहरातील प्रमुख ३० मार्गांवर १०० बस धावतील, असे नियोजन करण्यात आले.

100 buses run on 30 routes in Aurangabad city | औरंगाबाद शहरातील ३० मार्गांवर धावणार १०० बस

औरंगाबाद शहरातील ३० मार्गांवर धावणार १०० बस

googlenewsNext
ठळक मुद्दे तिकीट दर एसटीचे : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसोबत आयुक्त करणार चर्चा

औरंगाबाद : शहर बस लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दीर्घ चर्चा केली. चर्चेत शहरातील प्रमुख ३० मार्गांवर १०० बस धावतील, असे नियोजन करण्यात आले. आज एसटी महामंडळाचे असलेले दरच भविष्यात राहतील याअनुषंगाने महापालिका प्रयत्न करणार आहे. महापालिकेच्या शहर बससेवेला स्थानिक अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून प्रचंड विरोध होणार आहे. त्यांच्यासोबतही चर्चा करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी नमूद केले.
एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात शहर बससंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक कॅ. आर. आर. पाटील, मुंबईचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी, स्थानिक विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी आदींची उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, शहर बस सुरू करण्यासाठी महामंडळासोबत चर्चा करण्यात आली. डिसेंबरमध्ये ५० आणि जानेवारीत ५० बस शहरात दाखल होणार आहेत. सध्या महामंडळाकडून २५ ते ३० बस शहरात चालविण्यात येत आहेत. तूर्त चालक, वाहक आदी स्टाफ मंडळाकडे उपलब्ध आहे. बससेवा सुरू करण्यापूर्वी राज्य मार्ग परिवहन प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बसचे डिझाईन, वाहतूक मार्ग, भाडे निश्चित केले जाईल. मनपा आणि एसटी महामंडळ संयुक्तपणे हा प्रस्ताव तयार करून स्मार्ट सिटीच्या बैठकीत सादर करून त्यास मंजुरी घेण्यात येईल. आठ दिवसांत राज्यमार्ग परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. मनपा हद्दीलगत असलेल्या गावांना सिटीबस सेवा पुरविण्यात येईल. साधारण २० किलोमीटरपर्यंत शहर बससेवा राहणार आहे. एसटी महामंडळाच्या सिटीबसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना अनेक सवलतींचा लाभ मिळतो. त्याबदल्यात राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला अनुदान मिळते; परंतु मनपाला सवलती देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागले, असेही आयुक्तांनी नमूद केले.
अत्याधुनिक बसमध्ये पॅनिक बटन
स्मार्ट सिटीच्या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येणार आहे. अचानक बस थांबविण्यासाठी पॅनिक बटन राहणार आहे. जीपीएस सिस्टिम लावली जाणार आहे. बसमधील प्रवाशांना पुढचा थांबा कोणता या बद्दलची माहिती ध्वनिक्षेपकावरून मिळणार आहे. बसमध्ये डिस्प्ले बोर्ड लावण्यात येतील. प्रवाशांसाठी बसथांबे बांधले जातील. काही बसथांबे पीपीपी तत्त्वावर बांधून दिले जाणार आहेत.

Web Title: 100 buses run on 30 routes in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.