औरंगाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्तेशी संबंधित 100 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 02:54 PM2021-01-30T14:54:02+5:302021-01-30T14:59:23+5:30
Imtiaz Jalil या घोटाळ्यांमध्ये महापालिकेचे तत्कालीन अधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी, तालुका भूमिअभिलेख विभागातील अधिकारी सामील असल्याचा आरोप
औरंगाबाद : जालना रोडवर मोंढा नाका येथे वक्फ बोर्डाची जागा काही व्यापारी आणि बांधकाम व्यवसायिकांना आंदण म्हणून देण्यात आली. मागील पंधरा वर्षांमध्ये शंभर कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आज एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
यावेळी ते पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाची जागा विधवा, अनाथ आणि गरजू नागरिकांना द्यावी असे ॲक्ट मध्ये नमूद केलेले आहे. मोंढा नाका येथे वेगवेगळ्या कोट्यावधी मंडळींना असंख्य प्लॉट देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या मालमत्तांची रजिस्ट्री करण्यात आली आहे. नियमानुसार वक्फ बोर्डाची जागा लीज पद्धतीने देता येते. वक्फ बोर्डाची एनओसी असताना महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेल्या आहेत. या घोटाळ्यांमध्ये महापालिकेचे तत्कालीन अधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी, तालुका भूमिअभिलेख विभागातील अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.
या घोटाळ्यासंदर्भात शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. एका महिन्यात दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही तर आपण 26 फेब्रुवारी पासून 1000 कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.