गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:13 PM2024-08-01T12:13:58+5:302024-08-01T12:13:58+5:30

विद्यापीठात शिष्यवृत्तीधारकांची संख्या आणि रक्कम पाहता त्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासते आहे.

100 crore scholarship annually to 2000 PhD researchers in the BAMU university | गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती

गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न संशोधन केंद्रांमध्ये संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्या तब्बल २ हजार १६ विद्यार्थ्यांना वार्षिक १०४ कोटी रुपयांची संशोधन शिष्यवृत्ती मिळते, अशी माहिती समोर आली आहे. विद्यापीठाने ‘पेट’ची प्रक्रिया सुरू केली असून, ही संख्या वाढणार असल्याचा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठ आणि संलग्न १७८ संशोधन केंद्रांमध्ये १ हजार ७६७ मार्गदर्शकांच्या नेतृत्वात तब्बल ३ हजार ९८२ विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. त्यातील काही पूर्णवेळ तर काही अर्धवेळ संशोधन करतात. त्यांपैकी २ हजार १६ विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून ३३ ते ४५ हजार रुपयांदरम्यान शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. या शिष्यवृत्तीचा वार्षिक आकडा १०४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी चाचणी परीक्षा (पेट) घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नेट जेआरएफ, शिष्यवृत्ती मिळालेल्या एम. फिल.धारकांनाही महिनाभरात पीएच.डी.साठी नोंदणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीधारक संशाेधकांचा आकडा वाढणार आहे.

‘नॅक‘च्या मूल्यांकनात होणार फायदा
येत्या काही दिवसांत विद्यापीठाचे ‘नॅक’कडून मूल्यांकन होणार आहे. या मूल्यांकनामध्ये संशोधन हा महत्त्वाचा भाग असतो. विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे संशोधक व संशोधन कमी आहे. या विद्यार्थ्यांच्या संशोधनामुळे नॅक मूल्यांकनात हातभार लागेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बेरोजगारांना शिष्यवृत्तीचा दिलासा
संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळालेल्या युवकांमध्ये बहुतांश प्राध्यापकांसाठी आवश्यक अर्हता सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. प्राध्यापकांच्या जागा भरल्या जात नसल्यामुळे संशाेधकांना शिष्यवृत्तीचाच दिलासा आहे.

स्वतंत्र शिष्यवृत्ती विभागाची गरज
विद्यापीठात पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर विभागांतर्गतच व्यवस्था केलेली आहे. मात्र, शिष्यवृत्तीधारकांची संख्या आणि रक्कम पाहता त्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासते आहे. त्यातून संशोधकांना सुरळीतपणे सेवा मिळू शकते, असे संशोधक विद्यार्थ्याने सांगितले.

शिष्यवृत्तीधारक पीएच.डी. संशोधक संस्था......................................विद्यार्थी संख्या
बार्टी.........................................६८१
सारथी........................................४४८
महाज्योती...................................१७३
राजीव गांधी शिष्यवृत्ती...................२९७
नेट जेआरएफ................................१४४
राष्ट्रीय शिष्यवृत्ती एससी प्रवर्ग ............२८
दिव्यांग शिष्यवृत्ती ..............................१८
कोठारी शिष्यवृत्ती ..............................०२
राष्ट्रीय शिष्यवृत्ती एसटी प्रवर्ग ............ ५२ 
आयसीएसएसआर .............................४०
माैलाना आझाद अल्पसंख्याक .............१२६
सिंगल गर्ल चाइल्ड................................०४
एकूण ................................. २०१६

Web Title: 100 crore scholarship annually to 2000 PhD researchers in the BAMU university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.