महापालिकेने आधी मोडली १०० कोटींची ‘मुदत ठेव’; आता मंजुरीसाठी उठाठेव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:45 PM2023-03-24T19:45:29+5:302023-03-24T19:45:57+5:30

एफडी मागेच मोडली असून, त्याला कार्योत्तर मंजुरी गुरुवारी देण्यात आली.

100 Crores 'Fixed Deposit' was broken by the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; Now raised for approval | महापालिकेने आधी मोडली १०० कोटींची ‘मुदत ठेव’; आता मंजुरीसाठी उठाठेव

महापालिकेने आधी मोडली १०० कोटींची ‘मुदत ठेव’; आता मंजुरीसाठी उठाठेव

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सिटी बससाठी असलेली १०० कोटींची मुदत ठेव रस्ते कामासाठी मोडल्यानंतर कार्योत्तर मंजुरीचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनच्या मेंटॉर विनिता वेद-सिंघल यांनी शंभर कोटींचा निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यास मान्यता दिल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

संचालक मंडळाच्या वर्षभरानंतर झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या मेंटॉर सिंघल या ऑनलाइन सहभागी झाल्या. डॉ. चौधरी यांनी सांगितले, दोनशे कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीने शहर बस चालविण्यासाठी ‘एफडी’त ठेवला होता. २०२९ पर्यंत बस चालविण्याच्या नियोजनासाठी ही तरतूद होती. सध्या शहर बसच्या माध्यमातून रोज मिळणारे उत्पन्न ‘फिक्स डिपॉझिट’मध्ये ठेवले जात आहे. २०२९ पर्यंत शहर बससाठी आवश्यक निधी राखीव ठेवून उर्वरित निधी रस्ते कामासाठी वापरण्याच्या निर्णयाला बैठकीत मंजुरी मिळाली.

मंडळामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय व मनपा प्रशासक डॉ. चौधरी यांना संचालक म्हणून मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी पांडेय ऑनलाइन बैठकीला हजर होते. स्मार्ट सिटी कार्यालयातून संचालक भास्कर मुंढे, उल्हास गवळी, सीईओ डॉ. चौधरी, अतिरिक्त सीईओ अरुण शिंदे बैठकीला उपस्थित होते.

या कामांबाबतही निर्णय
वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान अखंड उड्डाणपूल व मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन कंपनीने महामेट्रो काॅर्पोरेशनला वर्क ऑर्डर दिली आहे. मेट्रोचा डीपीआर तयार करण्यासाठी लागणारा खर्च स्मार्ट सिटीतून करण्यासह, मुख्य लेखाधिकारी नियुक्ती व इतर कामांना देखील कार्योत्तर मंजुरी मिळाली. शहरात ३३० कोटींचे रस्ते मनपाने पाच ते सहा वर्षांत केले आहेत.

तिजोरीत ८० कोटी; निर्णय ३१८ कोटींचा
स्मार्ट सिटीचे एकूण टेंडर ३१८ कोटींचे
मनपा तिजोरीत होते ८० कोटी
१०० कोटींचा एफडी मोडून ४४ रस्त्यांचा निर्णय
तिजोरीतील ८० कोटींतून २२ रस्त्यांचे काम सुरू

सध्या काय परिस्थिती?
एफडी मागेच मोडली असून, त्याला कार्योत्तर मंजुरी गुरुवारी देण्यात आली. परंतु कंत्राटदाराने १०० कोटींच्या रस्त्याचे काम थांबविले आहे. वाढीव दराची कंत्राटदाराची मागणी आहे. त्यामुळे १०० कोटींचा एफडी मोडूनही ४४ रस्त्यांच्या कामांचे काय होणार, हे आताच सांगणे अवघड आहे.

किती किलोमीटर रस्त्यांची बांधणी?
५६८ कोटी रुपयांचे एकूण रस्त्यांचे नियोजन असून, आजवर ३३० कोटींची कामे झाली आहेत. १०० कोटींच्या एफडीतील कामे दरवाढीत अडकली आहेत. १३८ कोटींच्या कामांसाठी मनपाकडे पैसाच नाही. अंदाजे ३०० ते ३२५ किमी रस्ते बांधणी पूर्ण तरतुदीतून होणे अपेक्षित आहे.

Web Title: 100 Crores 'Fixed Deposit' was broken by the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; Now raised for approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.