छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच
By मुजीब देवणीकर | Published: September 12, 2024 01:47 PM2024-09-12T13:47:20+5:302024-09-12T13:48:09+5:30
दररोज महेमूद दरवाजा, मकाई गेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे
छत्रपती संभाजीनगर : पानचक्की येथील महेमूद दरवाजा, मकबऱ्याकडे जाणाऱ्या मकाई गेट आणि मिलकॉर्नर रोडवरील बारापुल्ला गेट येथील ४०० वर्षे जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा मागील वर्षी १७ सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. वर्ष उलटले, तरी ना निधी मिळाला ना काम सुरू झाले. त्यामुळे शहरवासीयांची वाहतूककोंडीतून तूर्त तरी सुटका होणार नाही.
बारापुल्ला गेट येथे एका बाजूने रस्ता करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीला किंचित दिलासा मिळाला आहे. मिलकॉर्नरकडून लिटर फ्लॉवरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना गेटमधून जावे लागते. तेथे अनेकदा कोंडी होते. येथील पूलही ४०० वर्षे जुने आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी पुलाचे आयुष्य संपल्याचा निर्वाळा दिला होता. त्याचप्रमाणे पानचक्की येथील गेट अत्यंत छोटा आहे. आता तर गेटमधून एकच वाहन एकाच वेळी ये-जा करू शकते. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी मोठी वाहतूककोंडी होते. या ठिकाणी असलेले सर्वात उंच पूलही जीर्ण झाले आहे. गेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्याची चर्चा अनेकदा झाली. घाटी रुग्णालयाच्या पाठीमागील रोडवरील मकाई गेट येथेही वाहतूककोंडी नित्याचीच आहे. येथील पूलही मोडकळीस आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेला लोटले वर्ष
मागील अनेक वर्षांपासून आ. प्रदीप जैस्वाल निधीसाठी पाठपुरावा करीत आहेत. मागील वर्षी १७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात आले होते. त्यांनी महापालिकेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात पुलांसाठी १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. वर्षभरात यासंदर्भात कोणतीच कारवाई झाली नाही. सार्वजनिक बांधकाम, मनपाला एक रुपयाचाही निधी प्राप्त झाला नाही.
फाइल तयार, निधीही मिळेल
पानचक्की आणि मकाई गेट येथील पुलांसाठी जवळपास ७५ कोटी रुपये मिळतील. फाइल तयार आहे. निधीची तरतूदही होईल. लवकरच निविदाही निघणार आहे. बारापुल्ला गेट येथे एका बाजूने रस्ता केला. त्यामुळे दोन पुलांसाठी निधी मिळेल.
- प्रदीप जैस्वाल, आमदार, मध्य.
पूल झाल्यानंतर काय होईल
मकाई गेट, बारापुल्ला गेट आणि महेमूद दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता करावा. जेणेकरून ऐतिहासिक गेटचे संरक्षण होईल. वाहतूककोंडी बंद होईल. जीर्ण पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी पूल झाल्यास नागरिकांना ये-जा करायला त्रास होणार नाही.