१०० कोटींचे रस्ते; कामांची तारीख सांगणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:13 AM2019-01-17T00:13:34+5:302019-01-17T00:14:00+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी टी. व्ही. सेंटर चौकात १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले. तीन आठवड्यांनंतरही महापालिकेने ३० पैकी एकाही रस्त्याचे काम सुरू केले नाही. बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे कधी सुरू करणार? हिवाळ्यात सिमेंट रस्त्यांचे काम करण्यासाठी पोषक वातावरण असताना दिरंगाई का? या मुद्यावर प्रशासनाची चारही बाजूने कोंडी केली. शेवटपर्यंत प्रशासनाने कामे कधी सुरू होणार याची तारीख जाहीर केली नाही.
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी टी. व्ही. सेंटर चौकात १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले. तीन आठवड्यांनंतरही महापालिकेने ३० पैकी एकाही रस्त्याचे काम सुरू केले नाही. बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे कधी सुरू करणार? हिवाळ्यात सिमेंट रस्त्यांचे काम करण्यासाठी पोषक वातावरण असताना दिरंगाई का? या मुद्यावर प्रशासनाची चारही बाजूने कोंडी केली. शेवटपर्यंत प्रशासनाने कामे कधी सुरू होणार याची तारीख जाहीर केली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ३० रस्त्यांची कामे सुरू होतील, असे औरंगाबादकरांना वाटत होते. मागील पंधरा दिवसांमध्ये मनपाने एकाही रस्त्याचे काम सुरू केले नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीसह इतर नगरसेवकांनीही प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. १०० कोटींच्या प्रकल्पासाठी नेमलेले कार्यकारी अभियंता काकडे आणि तांत्रिक कक्षप्रमुख एम. बी. काझी यांनी खुलासा केला की, जिथे कामे करावयाची आहेत, तेथील माती परीक्षण, रस्त्यांची लेव्हलिंग करणे आदी कामे बाकी होती. ही कामे झाली असून, लवकरच कामांना सुरुवात करण्यात येईल. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मदत घेतली आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार समिती नेमण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक रस्त्यावर एक माहिती फलक असेल, जेणेकरून नागरिकांना कामाची इत्थंभूत माहिती मिळेल. या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले की, दर पंधरा दिवसांनी मी स्वत: या कामांचा आढावा घेणार आहे. कामांचा दर्जा राखण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल. काम कधी सुरू होणार यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. शेवटी महापौर नंदकुमार घोडेले यांनी लवकरात लवकर कामे सुरू करण्याचे आदेश दिले.