विद्यापीठातील ६२ पैकी फक्त ७ अभ्यासक्रमांना १०० टक्के प्रवेश
By राम शिनगारे | Published: August 7, 2024 04:48 PM2024-08-07T16:48:14+5:302024-08-07T16:48:29+5:30
१३ अभ्यासक्रमांना एक आकडी संख्या तर २७ विभागांमध्ये ५० टक्क्याहून कमी प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ पैकी फक्त ७ पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाच १०० टक्के प्रवेश झाले आहेत. १३ अभ्यासक्रमांना १० टक्के पेक्षा कमी आणि २७ विभागांमध्ये ५० टक्क्यांहून कमी प्रवेश झाल्याची धक्कादायक आकडेवारी 'लोकमत'ला प्राप्त झाली आहे. स्पॉट प्रवेशाची फेरी पूर्ण झालेली असून, रिक्त जागांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यापीठासह धाराशिव येथील उपकेंद्रांमधील संपूर्ण अभ्यासक्रमांना सीईटीद्वारेच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी १५ मे पासून सुरू झालेली प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांनंतर पूर्ण झाली. २ ऑगस्ट रोजी स्पॉट ॲडमिशन व त्याच दिवशी नोंदणी करून ५ ऑगस्टपर्यंत प्रवेश करण्याचे नियोजन केले होते. पहिल्या फेरीनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांना फक्त ४१९ प्रवेशाची नोंद झाली होती. दुसऱ्या फेरीत हा आकडा ५०० च्या आसपास होता. स्पॉट ॲडमिशनमुळे ही संख्या १२१६ वर पोहचली. ६२ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उपलब्ध २ हजार १२१ जागांवर १ हजार २१६ प्रवेश झाले आहेत. त्याची टक्केवारी ५१.३० एवढी आहे.
१०० टक्के प्रवेश झालेले अभ्यासक्रम
रसायनशास्त्र (७३), संगणकशास्त्र (४०), फाॅरेन्सिक सायन्स (४०), उर्दू (४०), विधि (६०), परफॉर्मिंग आर्ट (३०) आणि सोशल वर्क अभ्यासक्रमाला ६० प्रवेश झाले आहेत.
एक अंकी प्रवेश झालेले अभ्यासक्रम
बायकेमिस्ट्री (४), इलेक्ट्रॉनिक्स (६), रुरल टेक्नॉलॉजी (३), बायोडायर्व्हसिटी (४), संख्याशास्त्र (९), इंडस्ट्रीयल ॲटोमेशन (६), महात्मा फुले व डॉ. बी.आर. आंबेडकर विचार (०), मास्टर ऑफ आर्ट (८), फाईड आर्ट इल्युस्टेशन (७), पेंटिंग (९), फाईन आर्ट बाय रिसर्च (९) आणि म्युझिक ८.
एकूण प्रवेशाची स्थिती
उपलब्ध जागा : २१२१
इच्छुक विद्यार्थी : २५२९
प्रत्यक्ष प्रवेश : १२१६
प्रवेशाची टक्केवारी : ५१.३०
विभागप्रमुखांना प्रवेशाचे अधिकार
काही जागा शिल्लक राहिल्या असतील तर त्या भरण्याची परवानगी व सर्वाधिकार विभागप्रमुखांनी दिलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल कोठे आहे? इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रतिसाद कसा आहे? याविषयी सर्वंकष माहिती घेऊन पुढील निर्णय घेता येऊ शकतील.
- डॉ. वाल्मीक सरवदे, प्रकुलगुरू