१०० टक्के बसेस धावू लागल्या; मात्र गावांना खासगी वाहतुकीचाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:02 AM2021-06-26T04:02:16+5:302021-06-26T04:02:16+5:30
जिल्ह्यात ४८० फेऱ्या बंद : बस वाहतुकीसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर खर्च राम शिनगारे औरंगाबाद : कोरोनामुळे बंद झालेल्या ...
जिल्ह्यात ४८० फेऱ्या बंद : बस वाहतुकीसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर खर्च
राम शिनगारे
औरंगाबाद : कोरोनामुळे बंद झालेल्या वाहतुकीचा सर्वाधिक फटका एस.टी. महामंडळाला बसला आहे. अगोदरच तोट्यात चालणारे हे महामंडळ अधिकच गाळात फसले आहे. औरंगाबाद आगारात असलेल्या ५०० पेक्षा अधिक गाड्या आता धावू लागल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात असलेल्या एकूण फेऱ्यांपैकी ४८० फेऱ्या बंद आहेत. या मार्गावर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नसल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे फेऱ्या रद्द केलेल्या ठिकाणी प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार असल्याचे पाहणीत समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या आगारात एकूण ५०० पेक्षा अधिक बस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. यातील आंतरजिल्हा केल्या जाणाऱ्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांना प्रतिसादही मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक मंदावलेली आहे. डिझेलचे वाढलेले दर, कोरोनाच्या काळात बंद बसेसमुळे वाढलेला मेंटेनन्स आणि प्रवाशांची वानवा यामुळे महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळ प्रवाशांचा प्रतिसाद नसलेल्या मार्गांवर पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्याच्या तयारीत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पॉईंटर
एकूण बसेस : ५००
सध्या सुरू असलेल्या बसेस : ५००
आगारात उभ्या असलेल्या बसेस : ००
एकूण कर्मचारी : २९००
चालक : १२१८
वाहक : ९६७
सध्या कामावर चालक : १२१८
सध्या कामावर वाहक : ९६७
बॉक्स
प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार
औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम भागात बसेस जात नाहीत. कोरोनाच्या पूर्वी दिवसाकाठी सकाळ, संध्याकाळ बसची एक फेरी होत असे. मात्र आता ती पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे पिकअप, छोटा हत्ती, रिक्षा, जीपसह इतर खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.
कोट,
तालुक्याच्या गावाला बसेस नाहीत
तालुक्याचे गाव असताना साेयगावमध्ये येण्यासाठी संध्याकाळी सहा वाजेनंतर बस नसते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन, जास्त भाडे देऊन गाव गाठावे लागते. याशिवाय शेजारील गावांमध्ये जाण्यासाठी पुरेशा बसच्या फेऱ्या नाहीत. त्यामुळे रिक्षा, खासगी चारचाकी वाहनांनी प्रवास करावा लागतो.
- कैलास पंडित, प्रवासी, सोयगाव