ज्येष्ठांना १०० टक्के अर्थसाहाय्य; ‘वयोश्री’ योजनेसाठी अर्ज केला का? कागदपत्रे काय लागतात?
By साहेबराव हिवराळे | Published: July 24, 2024 08:14 PM2024-07-24T20:14:49+5:302024-07-24T20:15:26+5:30
एकदमच घोषणांचा पाऊस झाल्याने ‘सेतू’वर कागदपत्रांसाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ३००० रुपये ज्येष्ठांना मिळणार असून, गेल्या सहा महिन्यांत १००० अर्ज वाटप झाले असून, आजपर्यंत २५ अर्ज भरून आले आहेत.
एकदमच घोषणांचा पाऊस झाल्याने ‘सेतू’वर कागदपत्रांसाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. वृद्धांच्या श्रवणयंत्र, काठी, फोल्डिंग चेअर व इतर साहित्य खरेदीसाठी बचत खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे.
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना?
महाराष्ट्रातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी ही योजना अर्थसाहाय्याच्या स्वरूपात राबवली जात आहे. वयोमर्यादेमुळे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपक्रम खरेदी करण्याकरिता ही योजना आहे.
कोण आहे पात्र?
महाराष्ट्रातील रहिवासी व वयाची ६५ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असावे. अर्जदाराकडे आधारकार्ड असावे किंवा आधार नोंदणी असावी. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड असावे.
काय लाभ मिळतो?
वयोश्री योजनेंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना ३ हजार रुपये साधने खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत. या साधनांमध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर आदींचा समावेश आहे.
कागदपत्रे काय लागतात?
योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अर्ज कोठे करायचा?
वयोश्री योजनेच्या लाभासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, छत्रपती संभाजीनगर येथे अर्ज सादर करावेत.
२५ भरून आले...
छत्रपती संभाजीनगरात १००० अर्जाचे वाटप करण्यात आले असून, लाभार्थ्यांच्या वतीने फक्त २५ अर्ज दाखल झाले आहेत. २५ ऑगस्ट ही अर्ज घेण्याची अखेरची मुदत आहे.
- पी. जी. वाबळे, सहायक कल्याण आयुक्त