बाजारात १०० टन भाज्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:02 AM2021-09-13T04:02:52+5:302021-09-13T04:02:52+5:30
औरंगाबाद : महालक्ष्मीच्या आगमनानंतर दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, सोमवारी महालक्ष्मीचे पूजन व नैवेद्य दाखवून नंतर जेवणावळी होत असतात. ...
औरंगाबाद : महालक्ष्मीच्या आगमनानंतर दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, सोमवारी महालक्ष्मीचे पूजन व नैवेद्य दाखवून नंतर जेवणावळी होत असतात. महालक्ष्मीच्या नैवेद्यात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. त्या खरेदीसाठी बाजारात रविवारी गर्दी झाली होती. सोबत पूजेचे सामानही खरेदी केले जात होते. जाधववाडी अडत बाजारात १०० टन भाजीपाल्याची आवक झाली असून, १६ प्रकारच्या एकत्रित भाज्या १०० ते १२० रुपये किलोपर्यंत विकल्या जात होत्या.
महालक्ष्मी सणाच्या काळात १२५ टनापर्यंत भाज्यांची आवक होत असते. मात्र, मागील ७ तारखेपासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे जाधववाडी अडत बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली होती. रविवारी अडत आजारात १०० टनांच्या जवळपास भाज्या आल्या होत्या. मागणीच्या तुलनेत कमी आवक झाल्याने पालेभाज्यांचे भाव जुडीमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले होते. मेथी २० रुपये जुडी, पालक, शेपू, कोथिंबीर १५ रुपये जुडी विकली जात होती. फळभाज्यांचे भाव स्थिर होते. १६ प्रकारच्या एकत्रित भाज्या १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात होत्या.
औरंगपुरा भाजी मंडई, केळीबाजार रस्ता, गजानन महाराज मंदिर रोड, शिवाजीनगर, सिडको-हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणात सर्वत्र चौकाचौकांत भाज्यांची विक्री केली जात होती.
चौकट........................
हार ५०० रुपये जोडी
महालक्ष्मीला फुलांचा हार घातला जातो. ऐनवेळी फजिती नको म्हणून अनेक लोकांनी हाराच्या ऑर्डर आठ दिवसांपूर्वीच देऊन ठेवल्या होत्या. बाजारात खास महालक्ष्मीचे हार ५०० ते ८०० रुपये जोडीपर्यंत विकले जात होते. रविवारी फुलांचे भाव वधारले होते. कालपर्यंत १५ रुपये किलोने विकला जाणारा झेंडू आज ४० ते ५० रुपये किलो विकला गेला. शेवंती १२० ते १५० रुपये, निशिगंध ४०० रुपये, गलांडा ४० ते ५० रुपये, मोगरा ६०० रुपये, काकडा ६०० रुपये किलो, तर जरबेरा ५० ते ७० रुपयांत १० नग विकले जात होते.