बेगमपुऱ्यातील १०० वर्ष जुनी इमारत कोसळली, जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:31 AM2018-07-27T11:31:43+5:302018-07-27T11:33:31+5:30
बेगमपुरा येथील ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुनी इमारत आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोसळली.
औरंगाबाद : बेगमपुरा येथील ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुनी इमारत आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोसळली. इमारतीचे मालक कृष्णा राऊत यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.
कृष्णा राऊत हे बेगमपुरा भागात ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुन्या इमारतीमध्ये मागील २७ वर्षांपासून राहत. इमारतिचे बांधकाम जुन्या पद्धतीचे लाकडी आहे. तळमजल्यावर एक किराणा दुकान, पहिल्या मजल्यावर राऊत स्वतः तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचे भाऊ नागेश राऊत राहत. गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास कृष्णा यांना इमारतीमधून आवाज येत होते, त्यांनी लागलीच इमारतीमधील सर्वाना जागे करत बाहेर काढले. यानंतर पहाटे ५ वाजेच्या सुमारास इमारत कोसळली. कुष्णा यांच्या मते इमारत व्यवस्थित होती, यामुळे तिच्या कोसळण्याचे कारण सांगता येणार नाही.