मराठवाड्यात कोरोना नियंत्रणासाठी आजपर्यंत १ हजार कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 12:05 PM2021-10-27T12:05:01+5:302021-10-27T12:10:16+5:30
Corona Virus in Marathwada : कोरोना नियंत्रणासाठी घेतलेल्या कोटींच्या कोटी उड्डाणांचे परीक्षण
औरंगाबाद : मराठवाड्यात ( Marathwada ) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला नियंत्रित करण्यासाठी मार्च २०२० ते आजपर्यंत १ हजार कोटींचा ( 1000 crore spent till date for corona control in Marathwada) चुराडा झाला. कोरोना ( Corona Virus ) नियंत्रणासाठी घेतलेल्या कोटींच्या कोटी उड्डाणांचे परीक्षण करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली.(
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज ठरणारी उपचार यंत्रणा उभी केली आहे त्या पार्श्वभूमीवर चाचण्या, लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषधोपचार, दवाखान्यांचे फायर ऑडिटसह अधिक सतर्क असावे, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या. नागरिकांच्या आरोग्यासह जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीचा प्रयत्न नावीन्यपूर्ण योजनेतून होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शिक्षण, आरोग्य, सक्षम मनुष्यबळ, उत्पन्नवाढ आदी मानव विकास निर्देशांक वाढीच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक गरजेनुसार कामांचा समावेश करावा. अशाही सूचना त्यांनी केल्या. उपाययोजना आणि खर्च पाहता सर्व काही समाधानकारक असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व सर्व जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ आदींची बैठकीला उपस्थिती होती.
पहिल्या लाटेत ६७८ कोटींचा खर्च
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६७८ कोटींचा खर्च झाला. त्यात औरंगाबाद १०८ कोटी, जालना ७८ कोटी, परभणी ६७ कोटी, नांदेड १०७ कोटी, बीड १०२ कोटी, लातूर ८२ कोटी, उस्मानाबाद ८४ कोटी, हिंगोली जिल्ह्यात ४८ कोटींचा खर्च झाला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात २७१ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.