विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस प्रशासनाच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 07:06 PM2021-07-31T19:06:01+5:302021-07-31T19:07:45+5:30
गेल्या महिन्यात ‘एमआयएम’ने एका फार्महाउसवर कवालीचा कार्यक्रम घेऊन कोरोना अनुषंगाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात फार्महाउसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची माेहीम सुरू केली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस असण्याच्या संशय असून, जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना सर्वेक्षणाचा आदेश दिला आहे. खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सोयगाव- सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यांत जास्तीचे फार्महाऊस असून, ते व्यावसायिक उद्देशासाठी वापरण्यात येत असल्याचा संशय प्रशासनाला आला आहे.
गेल्या महिन्यात ‘एमआयएम’ने एका फार्महाउसवर कवालीचा कार्यक्रम घेऊन कोरोना अनुषंगाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात फार्महाउसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची माेहीम सुरू केली आहे.फार्महाउससाठी ‘फॉरेस्ट एनए’ आणि महसूल ‘एनए’ यापैकी काेणती परवानगी घेतलेली आहे, हे पाहणी करताना स्पष्ट होईल. फार्महाउससाठी ग्रामपंचायतींची बांधकाम परवानगी घेतलेली आहे का, शेतीमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नाही. याबद्दलही माहिती घेतली जाणार आहे. फार्महाउसची व्याख्या वेगळी आहे. शेतातील इमारती शोधणे, त्यांचा वापर कधीपासून आहे. त्या इमारती कधी बांधल्या आहेत. त्या नियमित करण्यासाठी महसूल अधिनियमांचा वापर केला जाणार आहे.
दंड तर लागेलच
अलीकडच्या काळात फार्महाउस बांधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कुठेही परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही. फार्महाउसची व्याख्या वेगळी आहे; परंतु काही जणांनी त्याचा वापर पर्यटन, पार्ट्यांसाठी सुरू केल्याचे दिसत आहे. अशा फार्महाउसचा शोध घेऊन त्यांना दंड लावून ते नियमित करून घ्यावे लागेल. ‘एनए’ केलेला नसेल, प्रादेशिक विकास आराखड्याचा विचार करून बांधकाम केलेले नसेल, तर दंड लागेलच, असे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले.
डोंगराळ भाग इको-सेन्सिटिव्ह
जिल्ह्यात इको-सेन्सिटिव्ह भाग मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपूर्वीच वेरूळ परिसरात बिबट्या आढळला. तो डोंगराळ भाग इको-सेन्सिटिव्ह आहे. अशा ठिकाणी फार्महाउस आहेत काय, याची शहानिशा प्रशासन करीत आहे. वेरूळ, खांडी पिंपळगाव, खुलताबाद, दौलताबाद, फुलंब्रीतील सारोळा, कन्नड परिसर, पैठण जायकवाडी परिसर, म्हैसमाळ, सोयगाव, देवळाई, सातारा, कचनेर, पाल फाटा येथील कमी-अधिक डोंगराळ भागात फार्महाउस असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. येथे बांधकाम करताना कोणती परवानगी घेतली आहे, याची पाहणी केली जात आहे. दोन महिन्यांत सर्व काही समोर येईल, अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी व्यक्त केली.