औरंगाबादेत शिवरायांच्या पुतळ्याला १०१ प्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:30 AM2018-07-27T00:30:14+5:302018-07-27T00:31:24+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी क्रांतीचौकात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.२६) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून १०१ प्रदक्षिणा घातल्या. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी क्रांतीचौकात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.२६) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून १०१ प्रदक्षिणा घातल्या. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने गेल्या काही दिवसांपासून ठोक आंदोलन सुरू केले. या आंदोलनांतर्गत कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली तर देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण केले. राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. औरंगाबाद शहरातील आंदोलनकर्त्यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेऊन शांततेच्या मार्गाने २१ जुलैपासून क्रांतीचौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. काल बुधवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. तर आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता शेकडो आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदक्षिणा सुरू केल्या. या प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी तेथे आले. या विद्यार्थ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत प्रदक्षिणांमध्ये सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’आदी घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. यावेळी मनोज गायके, योगेश डेरे, मुकेश सोनवणे, अंकत चव्हाण, साईनाथ वेताळ, रमेश गायकवाड, विशाल डिडोरे, सुरेश वाकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.