जिल्ह्यात १०५ नवे रूग्ण, ३३२ रूग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:19 PM2020-10-11T12:19:42+5:302020-10-11T12:20:11+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
या आकडेवारीसह जिल्ह्यातील एकूण मयत रुग्णांची संख्या १ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नव्या १०५ रुग्णांत ग्रामीण भागातील ३३, मनपा हद्दीतील ४३ आणि अन्य २९ रुग्णांचा समावेश आहे. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २९ आणि ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५, २१२ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३०, ९१६ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजघडीला ३, ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहे.