खड्डेमय रस्त्याचे १०७ बळी
By Admin | Published: July 17, 2017 12:45 AM2017-07-17T00:45:32+5:302017-07-17T00:46:05+5:30
जालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत. यात १०७ जणांनी जीव गमावला असून, १३६ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील वाढते अपघातांचे प्रमाण ही गंभीर समस्या ठरत आहे.
जिल्ह्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन, भरधाव वाहन चालविणे या प्रकारांमुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य व अन्य रस्त्यांवर एक जानेवारी ते १० जुलै २०१७ दरम्यान अपघाताच्या २०६ घटना घडल्या आहेत.
वडीगोद्री, अंकुशनगर या भागातून जाणाऱ्या सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या सात घटनांमध्ये तीनजण ठार झाले असून, आठ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जालना-औरंगाबाद, जालना-भोकरदन, जालना-परभणी, जालना-बीड, जालना-बुलडाणा, सिंदखेडराजा या राज्यमार्गावर १०७ घटना घडल्या आहेत. यात ६० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ८३ गंभीर तर १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर ९२ अपघातांमध्ये ४४ जणांचा बळी गेला आहे. तर ६५ जण जखमी झाले आहेत.
अपघाती मृतांमध्ये पुरुषांची संख्या १०१ असून, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अवैध वाळू वाहतुकीमुळे भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी आहे. अपघात वाढीचे हे एक प्रमुख कारण असून, याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.