दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या; आता नीट, सीईटीसह जेईई ॲडव्हान्स परीक्षांच्या तयारीला वेग
By राम शिनगारे | Published: March 28, 2024 06:17 PM2024-03-28T18:17:53+5:302024-03-28T18:18:01+5:30
शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभाग कॉपी प्रकरणात आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांना फेब्रुवारी महिन्यात सुरुवात झाली होती. या दोन्ही परीक्षा मंगळवारी संपल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा असून, विभागीय मंडळे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्तरपत्रिकांच्या कामाला वेग आला असल्याची माहिती मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी दिली.
शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती, तर दहावीच्या परीक्षा १ मार्च रोजी सुरू करण्यात आल्या होत्या. २६ मार्च रोजी बारावीची आयटी विषयाची परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली, तर दहावीचा शेवटचा पेपर भूगोल विषयाचा पूर्ण झाला. छत्रपती संभाजीनगर विभागात दहावीच्या भूगाेल विषयाला १ लाख ८१ हजार ६८० विद्यार्थी बसले होते. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या असल्याचेही सचिव वैशाली जामदार यांनी स्पष्ट केले. तसेच उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबविण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात काही शिक्षकांनी मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे जवळपास ५०० उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय मंडळात आले होते. आता तो विषयही मार्गी लागलेला आहे. सर्व उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे वितरण झाले असून, मूल्यांकन व्यवस्थितपणे करण्यात येत असल्याचेही सचिव जमादार यांनी स्पष्ट केले.
कॉपीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर
शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभाग कॉपी प्रकरणात आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी विभागात बारावीच्या परीक्षेत १११ विद्यार्थी गैरप्रकार करताना पकडले होते. यावर्षी ही संख्या १४२ पर्यंत पोहोचली आहे. दहावीच्या परीक्षेत मागील वर्षी ३० विद्यार्थी तर यावर्षी ८६ पकडण्यात आले आहेत. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत ही सर्वांधिक संख्या आहे.
विभागनिहाय परीक्षेत गैरप्रकार करणारे विद्यार्थी
विभाग................................दहावी.......................बारावी
छत्रपती संभाजीनगर..............८६.........................१४२
पुणे........................................१९..........................६८
लातूर.......................................१०........................२६
नागपूर...................................१३...........................१८
नाशिक....................................०६...........................२३
अमरावती.................................०५..........................११
मुंबई.......................................०१..........................११
कोल्हापूर.................................००..........................०३
कोकण.....................................००..........................०१
एकूण........................................१४०........................३०३