तूर खरेदी घोटाळ्यातील ११ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:45 AM2017-09-25T00:45:13+5:302017-09-25T00:45:13+5:30
नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील अकरा संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील अकरा संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणातील आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शरद किसन भुंबर (खोडेपुरी), ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिंदे (कन्हैय्यानगर), सतीश चंद्रकांत औषीकर (नळगल्ली), राजकमल हिरालाल बाहेती (संभाजीनगर), भगवान नानासाहेब आनंदे (श्रीकृष्णरुख्मिणीनगर), कैलास गणेश सहाणी (गोपीकिशननगर), संजय देविदास मिसाळ (हनुमानघाट) , सूदर्शन पाटीलबा भुंंबर (तुळजाभवानीनगर), विशाल नकुलराव भिसे (तांदुळवाडी) व कृष्णा मुरलीधर पवार (घोटण) यांचा समावेश आहे. तूर खरेदी घोटाळ्यातील ५९ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केला होता. त्यामुळे या आरोपींना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. गत दोन दिवसांपासून चंदनझिरा पोलिसांचे एक पथक तूर खरेदी घोटाळ्यातील संशितांच्या मागावर होते. पोलिसांनी रविवारी दिवसभर मोहीम राबवून वरील संशयितांना अटक केली. नाफेड केंद्रावरील तूर खरेदी घोटाळ्यात १८ व्यापारी ४९ शेतकरी व अन्य तिघांवर सप्टेंबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. त्यामुळे याबाबत उलटसूलट चर्चा सुरू होती. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सी.जे. गिरासे व उपनिरीक्षक परजाने यांच्या नेतृत्त्वात एक पथक स्थापन करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.