औरंगाबादमधील महत्वाच्या ठिकाणचे ११ सीसीटीव्ही बंद; आॅप्टिकल फायबर लाईन ४ दिवसांपूर्वी तुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:54 PM2018-01-19T13:54:19+5:302018-01-19T13:56:32+5:30
वायर तुटल्याने शहराच्या सुरक्षेसाठी विविध चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणांचे ११ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याची माहिती समोर आली. महापालिकेचे काम करणार्या ठेकेदाराकडून अपघाताने हे वायर तुटल्याने त्यास वायर जोडा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, असा सज्जड दम पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
औरंगाबाद : वायर तुटल्याने शहराच्या सुरक्षेसाठी विविध चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणांचे ११ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याची माहिती समोर आली. महापालिकेचे काम करणार्या ठेकेदाराकडून अपघाताने हे वायर तुटल्याने त्यास वायर जोडा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, असा सज्जड दम पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका सेफ सिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेरे बजावत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौक, गर्दीच्या ठिकाणी ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी वरदान ठरले आहेत. शहरातील सिडको भागात महानगरपालिकेचे काम सुरू आहे. हे काम करणार्या ठेकेदाराकडून सीसीटीव्ही कॅमेर्यांची आॅप्टिकल फायबर लाईन चार दिवसांपूर्वी तुटली. ही लाईन तुटल्यापासून सिडको, हडकोतील ११ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले.
ही बाब पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना समजताच त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदाराला बोलावून कॅमेर्यांचे तुटलेले वायर पुन्हा जोडणी करण्याचे सांगितले. हे काम करण्यासाठी आयुक्तांनी मुदतही दिली. विशेष म्हणजे या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अटक केली जाईल,असा सज्जड दमही दिला. यानंतर ठेकेदाराने काम करून देण्याची तयारी दर्शविली. मात्र अद्याप जोडणी न झाल्याने ११ कॅमेरे बंद असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.