विद्यापीठातील ११ अभ्यासक्रम बंद तर ४ नवे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 03:44 PM2021-08-24T15:44:37+5:302021-08-24T15:52:03+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University News : विद्यापीठाच्या वर्धापनदिनी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद : मागील पाच वर्षांत प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada Universit ) घेतला. तसेच ४ नवे अभ्यासक्रमही सुरू निर्णय घेण्यात आला.
विभागप्रमुखांनी होकार दिला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या वर्धापनदिनी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ४ नवे अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थी प्रतिसादानुसार विभागांच्या प्रवेश क्षमतेत वाढ-घट करून काही विभागातील विभागांच्या विलगीकरणाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या पाच शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले एम.एस्सी. (अप्लाईड मॅथेमॅटिक्स), एम.टेक्. इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग), डीबीएम, सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफिसिएन्सी एन रशियन, बी.ए़ इंटरनॅशनल, बी़.एड्., एम.एड्. इन्टिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन ॲण्ड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बी़.ए. (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी ॲण्ड जीए), एम.एस्सी. नॅनो टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात येणार आहेत.
एम.एस्सी. इन फॉरेन सायन्स सुरू होणार
एम.एस्सी. इन फॉरेन सायन्स, एम.एस्सी. इन आर्टिफिसीयल इंन्टेलिजेन्स, एम.एस्सी. इन हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ हे चार अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
२३ कंत्राटी प्राध्यापक घेणार
वनस्पतीशास्त्र विभागात २, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेत (जीएमएनआयआरडी) ८, प्राणीशास्त्र, भूगोल, परकीय भाषा, पाली ॲण्ड बुध्दिझम, पत्रकारिता, फाईन आर्ट, मानसशास्त्र, योगा, याबरोबरच उस्मानाबाद उपक्रेंद्रातील बायोटेक्नॉलॉजी, ड्रामा ॲण्ड फोक आर्ट, भौतिकशास्त्र, गणित, तर मॉडेल कॉलेज घनसावंगी येथील बायोटेक्नॉलॉजी विभागात प्रत्येकी एक, असे एकूण २३ प्राध्यापक कंत्राटी पध्दतीने घेण्याचा निर्णय बैठकीत घेतला.