आरोपी पकडला, तपास खोलात नाही; ११ महिन्यांपूर्वीच उघड झाले असते ड्रग्ज माफियांचे काळे धंदे
By राम शिनगारे | Published: October 24, 2023 12:59 PM2023-10-24T12:59:46+5:302023-10-24T13:00:05+5:30
२५० कोटींचे अमली पदार्थ कनेक्शन : ज्या वाळूज एमआयडीसीतील कंपनीतून हे ड्रग्ज बाहेर आले, त्या कंपनीपर्यंत तपास पोहोचलाच नाही.
छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यातील काही कंपन्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची बाब गुजरात पोलिसांनी देशासमोर आणली. मात्र, शहर पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने ११ महिन्यांपूर्वी एका केमिकल कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यास अर्धा किलो सायकोट्राफिक नार्कोटिक ड्रग्ज हे रसायन विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एका आरोपीकडून सहा किलो ड्रग्ज जप्त केले. त्यातील एकाच प्रकरणात गुन्हा नोंदवला, तर दुसरे प्रकरण दडपण्यात आले. तेव्हाच दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करण्यात आला असता तर ११ महिन्यांपूर्वीच अमली पदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांची साखळी उघडकीस आली असती, अशी माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
शहरातील अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र एनडीपीएस पथकाची स्थापना केली होती. या पथकाने वाळूज एमआयडीसी भागातील एका कंपनीत औषधी सिरप बनविण्यासाठी आणलेला डायझेपाम (सायकोट्राफिक नार्कोटिक ड्रग्ज) हा ५५५ ग्रॅम द्रव पदार्थ नोव्हेंबर २०२२ मध्ये जप्त केला होता. ज्या आरोपीकडून डायझेपाम जप्त केले. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. मात्र, ज्या वाळूज एमआयडीसीतील कंपनीतून हे ड्रग्ज बाहेर आले, त्या कंपनीपर्यंत तपास पोहोचलाच नाही. त्यानंतर शहर पोलिसांच्या दुसऱ्या एका पथकाने गुजरात पोलिसांच्या सध्या रडारवर असलेल्या वाळूज एमआयडीसीमधील एका कंपनीचे ६ किलो ड्रग्ज पकडले. मात्र, ते प्रकरण रेकॉर्डवर येण्यापूर्वीच मोठ्या 'उलाढाली'मुळे जागेवरच रफादफा झाले. दोन्ही प्रकरणांत तत्कालीन अधिकाऱ्यांनी योग्य तपास केला असता; तर वाळूज, पैठण एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये बनविण्यात येणाऱ्या अमली पदार्थांवर नियंत्रण मिळाले असते. तसेच, जितेशकुमार हिन्होरिया प्रेमजीभाई या आरोपीला सर्वत्र संचार करण्याची संधीही मिळाली नसती, असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
खास 'एनडीपीएस'च्या पथकाची स्थापना
तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शहरातील अमली पदार्थ विक्रीवर पायबंद घालण्यासाठी १९ मे २०२२ रोजी एनडीपीएस पथकांची स्थापना केली होती. गुन्हे शाखेचे तात्कालीन निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नियंत्रणात सपोनि सय्यद मोहसीन, हरेश्वर घुगे यांच्या पथकांनी सुरुवातीच्या ९ महिन्यांच्या कालावधीत नशेच्या गोळ्या, गांजा, चरस, सिरप, कोकेन, मेफेड्रोनसह इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ७३ ठिकाणी छापे मारले. त्यात १२३ आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून ९२ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता. मात्र, सध्या कार्यरत असलेले 'एनडीपीएस' पथक करते काय, हाच प्रश्न गंभीर बनला आहे.
गुन्हे शाखेच्या कामगिरीची चर्चा
शहर पोलिसांची गुन्हे शाखा विभागाचा कणा आहे. याचा सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर वचक असायला पाहिजे. मात्र, सध्या गुन्हे शाखेच्या 'विशेष' कामगिरीची चर्चा शहर पोलिसांमध्ये करण्यात येत आहे. गुजरातचे पोलिस शहरात येऊन कारवाई करतात आणि त्याचा थांगपत्ताही शहर पोलिसांना लागत नाही. या नामुष्कीला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.