जिल्ह्यातील ३७ लाख लोकांच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ११ जणांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:04 AM2021-01-18T04:04:46+5:302021-01-18T04:04:46+5:30
औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ...
औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे, पण या कार्यालयात केवळ ११ अधिकारी, कर्मचारी असल्याने ही सुरक्षा फक्त कागदावरच सशक्त आहे.
पौष्टिक, शुद्ध, अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. त्यांना शुद्ध अन्न मिळावे याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ३७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स आहेत. त्यातील अधिकृत हजारांच्या आत आहेत. तेवढेच मिठाई विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ उत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या तपासणीचा भार केवळ आठ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तीन हजार औषधी दुकाने आहेत. त्यांच्या तपासणीसाठी तीन औषध निरीक्षक आहेत.
मागील अनेक वर्षांपासून या विभागात पद भरती झालीच नाही. उपलब्ध अधिकऱ्याकडून कसेबसे काम करून घेतले जात आहे. यामुळे अन्न व सुरक्षा अधिकारी असो व औषधी निरीक्षक प्रत्येक दुकानापर्यंत जाऊ शकत नाही.
चौकट
संपूर्ण औषधी दुकानाची तपासणी करणे अशक्य
जिल्ह्यात सुमारे तीन हजार औषधी दुकाने आहेत. मात्र, त्याची तपासणी करण्यासाठी अवघे तीन औषधी निरीक्षक आहेत. एकूण पदे सात आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर १५ औषधी निरीक्षकही कमी पडतात. तेथे तीन औषध निरीक्षक किती औषधी दुकानाची तपासणी करणार?
चौकट
हॉटेलची तपासणी वाऱ्यावरच
जिल्ह्यात आठ अन्न व सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्यावर पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स तपासणे, तेथील अन्न, पाणी, स्वछता तपासणे हे सुद्धा अशक्यच आहे. जेथे काही घटना घडते किंवा माहिती मिळते तिथे कारवाई केली जाते.
चौकट
कोर्ट कचऱ्या करण्यातच वेळ जास्त जातो
एक तर औषधी व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी. त्यात दर तीन वर्षाने त्यांच्या होणाऱ्या बदल्या. त्यात मागे ज्या जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी येतात. तेथे ज्या कारवाई केलेल्या असतात, त्यांच्या न्यायालयात याचिका सुरू असतात. त्यासाठी तेथील न्यायालयात हजर राहावे लागते. या कामाचा ताणही वाढतो.
चौकट
रिक्तपद भरती करणे आवश्यक
१९९४ मध्ये जिल्ह्यात १२ अन्न निरीक्षक होते. त्यानंतर लोकसंख्या वाढली, परंतु अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी आणखी कमी झाली. जेथे १५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेथे केवळ आठ पदे भरली आहेत. रिक्तपदे भरण्याची आवश्यकता आहे.
मिलिंद शहा
सहआयुक्त, अन्न प्रशासन
----
आकडेवारी
जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८
जिल्ह्यात हॉटेल्स पाच हजार
अन्न सुरक्षा अधिकारी ८
जिल्ह्यात औषधी दुकाने ३ हजार
औषधी निरीक्षक ३