सात शाळांच्या ११ वर्गखोल्या धोकादायक !
By Admin | Published: July 17, 2014 12:51 AM2014-07-17T00:51:49+5:302014-07-17T01:09:02+5:30
भूम : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ शाळांमधील ११ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
भूम : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ शाळांमधील ११ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सदरील वर्गखोल्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी दिला जातो. या माध्यमातून अनेक शाळांना टोलेजंग इमारती मिळाल्या आहेत. असे असले तरी भूम तालुक्यातील काही शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत. याबाबत तालुकास्तरीय कार्यालयाकडून प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला आहे. परंतु, अद्याप त्यावर कुठलाच निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शाळेच्या विद्यार्थ्यांना धोकादायक शाळेत बसूनच ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. सात शाळांचे मिळून ११ वर्गखोल्या विद्यार्थ्यांना बसण्यालायक नाहीत.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामकुंड येथील चार वर्गखोल्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. पावसाळ्यामध्ये छताच्या पत्र्यांना गळती लागते. सोनगिरी शाळेची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. एक वर्गखोली दुरूस्तीला आली आहे.
त्याचप्रमाणे दिमाखवाडी शाळेच्या दोन वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यापैैकी एका वर्गखोलीस तडे गेले आहेत. दुधोडी, हिवर्डा, ज्योतिबाचीवाडी व वाल्हा येथील शाळेची प्रत्येकी एक वर्गखोली वापराबोहर गेली आहे. (वार्ताहर)
तालुकास्तरीय यंत्रणेकडून वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी निधी मागणी करण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ही मागणी फारसी गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे संबंधित सात शाळांतील विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गात बसूनच ज्ञानाचे धडे गिरवावे लागतात.
तालुक्यातील विविध शाळांच्या मिळून ११ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. दुरूस्तीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्याप निधी मंजूर झालेला नाही. निधी उपलब्ध होताच दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
- तृप्ती अंधारे, गटशिक्षण अधिकारी, भूम.