सिल्लोडमध्ये एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस; अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 19:38 IST2024-09-03T19:37:38+5:302024-09-03T19:38:33+5:30
सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा नजारा बघण्यास मिळाला नाही.

सिल्लोडमध्ये एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस; अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहतोय
सिल्लोड : तालुक्यात रविवारी रात्री सर्व आठ मंडळांत अतिवृष्टी असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून सिल्लोड शहर, खुल्लोड, चिंचवन, आमसरी, देऊळगाव बाजार येथील जवळपास २० घरांची पडझड झाली आहे.
या पावसामुळे सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्प ५० टक्के भरला आहे. अजिंठा येथील वाघूर नदी, पूर्णा नदीला पूर आला आहे. पावसाचे पाणी सिसारखेडा, सावखेडा गावात व परिसरात अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. वसई फाटा (जळकी) नदीला पूर आल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहत होता. मात्र, सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा नजारा बघण्यास मिळाला नाही.
एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस
रविवारी रात्री सिल्लोड मंडळात १०८ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच भराडी ८१ मिमी, अंभई १३१, अजिंठा १२३, गोळेगाव बुद्रुक १३३, आमठाणा ९०, निल्लोड ११५, बोरगाव बाजार १०० मिलिमीटर असा सर्व आठ मंडळात सरासरी ११०.२५ मिलिमीटर पाऊस झाला.
बहुली गावाला पाण्याचा वेढा
सिल्लोड तालुक्यातील बहुली गावाच्या चारही बाजूंनी नद्या आहेत. पुराच्या पाण्याने या गावाला चारी बाजूंनी वेढा घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. सोमवारी दुपारी १२ वाजता पुराचे पाणी ओसरले. या पावसाने बहुली शिवारातील मका, कापूस, सोयाबीन, मिर्ची सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश
सिल्लोड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा, असे आदेश प्रभारी तहसीलदार शेख हारून यांनी तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांना सोमवारी दिले.