सोयगाव तालुक्यात १,११८ धोकादायक व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 06:29 PM2020-10-09T18:29:40+5:302020-10-09T18:30:22+5:30
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाचा पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. या सर्वेक्षणात सोयगाव तालुक्यात १२८ सारीच्या रुग्णांसह ५५ वर्षांवरील १,११८ व्यक्ती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोयगाव : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशावरून सोयगाव तालुक्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाचा पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. या सर्वेक्षणात सोयगाव तालुक्यात १२८ सारीच्या रुग्णांसह ५५ वर्षांवरील १,११८ व्यक्ती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोयगाव तालुका आरोग्य विभागाने दि. ९ रोजी सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना शुक्रवारी अहवाल सुपूर्द केला. या सर्वेक्षणात सोयगाव तालुक्यात तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांमध्ये १२८ सारीचे रुग्ण आढळून आले असून बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सारीच्या रुग्णांनी शतक गाठले आहे. जरंडी येथे २० आणि सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सारीचे ८ रुग्ण आढळले असून तब्बल १,११८ वृद्ध व्यक्ती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर तालुका आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. अंतिम सर्वेक्षणाअंती या उपक्रमात सोयगाव तालुक्यात नव्याने ९ कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून आले असून त्यांना जरंडी कोविड केंद्रातून कोरोनामुक्त करण्यात आले असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.