‘ग्रीनफिल्ड’चे ११३१ कोटी शहरासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:07 AM2018-09-13T01:07:29+5:302018-09-13T01:07:52+5:30
स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, असा निर्णय बुधवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, असा निर्णय बुधवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. निधी वळविण्याचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत लवकरच केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.
केंद्र शासनाने २०१५ मध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली. पहिल्या वर्षी ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा योजनेत समावेश झाला नाही. दुसऱ्या वर्षी केंद्राने औरंगाबाद शहराची निवड केली. स्मार्ट सिटीच्या १७३० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्राने मंजुरीही दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करावा म्हणून शासनाने दोन वर्षांपूर्वीच महापालिकेला २३० कोटी रुपयांचा निधीही दिला. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक वारंवार होत नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
या प्रकल्पात शहर बस खरेदी करण्यात आली. दिवाळीपर्यंत शहरात बसेस दाखल होतील. सेफ सिटीअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी निविदा काढली आहे. स्मार्ट योजनेत अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रीनफिल्ड होय. बुधवारी स्मार्ट सिटीचे मेन्टॉर तथा गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेण्यात आली. बैठकीत ग्रीनफिल्डसाठी राखीव असलेला ११३४ कोटी रुपयांचा निधी शहरात विविध विकास कामे करण्यासाठी वळविण्यात यावा, अशी आग्रही मागणी सर्व संचालक मंडळाने केली. पोरवाल यांनीही क्षणार्धात मंजुरी दिली. केंद्र शासनाने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यास शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे महापालिकेला शक्य होेईल.
बैठकीस उपमहापौर विजय औताडे, विरोधी पक्षनेता जमीर कादरी, सभागृहनेता विकास जैन, गटनेते भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती.
ग्रीनफिल्ड प्रकल्प काय होता...
ग्रीनफिल्डअंतर्गत चिकलठाणा येथे ५०० एकर जागेचे भूसंपादन करण्यात येईल. येथे सुंदर आयडियल एक छोटेसे शहर तयार करण्यात येईल. या वसाहतीत गुळगुळीत रस्ते, २४ तास पाणी, ड्रेनेज, टेलिफोन केबल अंडरग्राऊंड करण्यात येईल. २४ तास वीजपुरवठा, विजेच्या तारा जमिनीतून जातील.
दूषित पाणी वाहण्यासाठी नाल्या झाकलेल्या असतील. घरे भूकंपरोधक असतील. फुटपाथ, लहान रुग्णालय, पार्क आदी कामे या ठिकाणी करण्यात येतील. आयटी कंपन्या, उदयोन्मुख तरुणांना रोजगार, असे दिवास्वप्न या प्रकल्पातून दाखविण्यात आले होते. या प्रकल्पासाठी तब्बल ११३४ कोटी रुपयांची तरतूद केली होती.