रस्त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ११४ कोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:42 PM2020-09-23T13:42:00+5:302020-09-23T13:43:59+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंतीही शासनाला करण्यात आली आहे.
औरंगाबाद : आधीच रस्ते खराब आणि त्यात पावसाची भर यामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंतीही शासनाला करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांकडून पावसाने बाधित रस्ते व पुलांच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार मुख्य अभियंता डी. डी. उकीर्डे यांच्या कार्यालयाने शासनाकडे ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची सर्वाधिक वाईट अवस्था झालेली आहे. जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि पैठण तसेच कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद असे दोन विभाग असून या दोन्ही विभागांकडून ८ कोटी व ४ कोटी असा१२ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
आठ ते दहा दिवसांत निधी प्राप्त होईल, अशी अपेक्षा असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. तर दुसरीकडे आगोदरच रस्त्यांच्या कामांची शेकडो बिले शासनाकडे प्रलंबित असल्याने खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी निधी मिळतो की नाही याबद्दल साशंकताच वाटावी अशी परिस्थिती आहे.