परभणी जिल्ह्यातील ११५ शस्त्रपरवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:38 PM2017-10-31T23:38:38+5:302017-10-31T23:38:44+5:30
शस्त्र परवानाधारकांकडून मागविलेली माहिती उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील ११५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी एका आदेशानुसार रद्द केले आहेत. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शस्त्र परवानाधारकांकडून मागविलेली माहिती उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील ११५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी एका आदेशानुसार रद्द केले आहेत. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे़
दोन दिवसांपूर्वी परभणी येथे निरज हॉटेलसमोर गोळीबार झाल्याची घटना घडली होती़ यात एक जण जखमी झाला होता़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकृत व अनाधिकृत शस्त्र परवानाधारकांची माहिती घेतली तेव्हा ही बाब स्पष्ट झाली़ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील ७६८ जणांना शस्त्र वापरण्याचा परवाना दिला आहे़ या परवानाधारकांचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात येते़ देश पातळीवर असलेल्या एका प्रणालीत शस्त्र परवानाधारकांची नोंद घेण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली़ डाटा बेस एनडीएएल या प्रणालीसाठी जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांकडून माहिती मागविण्यात आली होती़
पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ आणि तहसील कार्यालयामार्फत परवानाधारकांना त्यांच्या परवान्यांसंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार परवाना निर्गमित केलेला दिनांक आणि जन्म दिनांकाबाबतची माहिती परवानाधारकांना द्यावयाची होती़ मात्र प्रशासनाला विहित वेळेत ही माहिती उपलब्ध झाली नाही़ त्यामुळे जिल्हा प्रशासन शस्त्र परवानाधारकांची माहिती एनडीएएल प्रणालीत भरू शकले नाही.
एनडीएएल प्रणाली माहिती भरल्यानंतर प्रत्येक शस्त्र परवानाधारकांना त्यांचा युआयएन क्रमांक दिला जाणार होता़ मात्र माहितीअभावी परवानाधारकांना हा युआयएन क्रमांक उपलब्ध होवू शकला नाही़ परिणामी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी १ एप्रिल २०१७ पासून ११५ शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले आहेत़