Maharashtra Bandh : वाळूजमध्ये उद्योगांचे ११६ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:36 AM2018-08-11T05:36:26+5:302018-08-11T05:36:42+5:30
वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे. यामध्ये १६ कोटी रुपयांचा शासनाचा करही बुडाला आहे. ४ हजार ५०० लहान-मोठे उद्योग वाळूज एमआयडीसीमध्ये आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये काही उद्योग सुरू झाले होते; परंतु आंदोलकांनी ते बंद पाडले. ९ वाजेपासून १०० टक्के उद्योग बंद झाले होते. त्यामुळे हे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
उद्योगांची एक उत्पादन प्रक्रिया असते. त्या पूर्ण साखळी प्रक्रियेवर बंदमुळे परिणाम झाला. बंदमुळे उद्योगांच्या उलाढालीवर परिणाम होणे हे औरंगाबादसाठी घातक आहे. उद्योग वर्तुळात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. उद्योगांना टार्गेट करून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.
पैठण एमआयडीसीमध्ये ‘युनिव्हर्सल लगेज’ या कंपनीमध्ये एक घटना घडली होती. त्या एका घटनेमुळे ती औद्योगिक वसाहतच पूर्णत: संपली. ९ तारखेच्या घटनेची माहिती उद्योग वर्तुळातील मल्टिनॅशनल कंपन्यांच्या मुख्यालयांपर्यंत गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही घटना नोंदविली गेली. याचा परिणाम डीएमआयसीत येणाऱ्या गुंंतवणुकीवरदेखील होणे शक्य आहे. बंद, तोडफोड, नुकसानीच्या घटनांमुळे औरंगाबादचा विकास होण्यावर परिणाम होईल. कर्मचाऱ्यांच्या गाड्या कंपनीच्या आत जाऊ न देण्यापर्यंत आंदोलन ठीक होते; परंतु सगळ्या औद्योगिक वसाहतीलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसत असल्याचे उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
वाळूजचे नुकसान झाल्यास औरंगाबाद ५० टक्क्यांवर येईल
वाळूज औद्योगिक वसाहतीचे नुकसान झाले, तर औरंगाबादचे उत्पन्न ५० टक्क्यांवर येईल. १२ लाखांच्या शहराची लोकसंख्या गृहीत धरली, तर ६ लाख लोकसंख्या उद्योगांवर अवलंबून आहे.उलाढालीवर बंदचा मोठा परिणाम होतो. औरंगाबादच्या उद्योग वर्तुळाची ३० हजार कोटींच्या मूल्यवर्धित कराच्या तुलनेत उलाढाल आहे. १० टक्क्यांच्या करतुलनेत ३ हजार कोटी रुपयांचा आकडा येतो. ३०० दिवस उत्पादनाचे दिवस धरून ३० हजार भागाकारच्या तुलनेने उत्पादन प्रक्रिया गृहीत धरली, तर १०० कोटींचे थेट नुकसान झाल्याचे दिसत असल्याचे मत उद्योजक कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महसूल विभाग आणि एमआयडीसीकडून पंचनामे सुरू
वाळूज औद्योगिक वसाहतीत ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत उद्योगांचे किती नुकसान झाले, याचा आकडा आवाक्याबाहेर असून, महसूल प्रशासन आणि एमआयडीसीने शुक्रवारी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.वाळूज एमआयडीसी गंगापूर तहसील आणि औरंगाबाद तहसील हद्दीमध्ये येते. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यात एमआयडीसीचा काही भाग आहे. त्या भागात असलेल्या उद्योगांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
बहुतांश उद्योग हे औरंगाबाद तहसील हद्दीमध्ये येतात. तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले, पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. विमा कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील पंचनामे करीत आहेत. किती नुकसान झाले याची माहिती लवकरच समोर येईल. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी तोडफोड झालेल्या कंपनीची शुक्रवारी दिवसभर पाहणी केली. पाहणी करून त्याचा अहवाल एमआयडीसी मुख्यालयात पाठविण्यात आला आहे. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राचा सुमारे ४५ लाख रुपयांचा फायरबंब आंदोलकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे वायाळ यांनी सांगितले.
गुरुवारच्या आंदोलनात रस्त्यावर झालेल्या दगडफेक, जाळपोळीमुळे साचलेला कचरा, रस्त्यांवर आडवे टाकलेले विजेचे खांब एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काढले. आंदोलकांनी जे रस्ते बंद केले होते, ते सुरू करण्यात आल्याचे वायाळ यांनी सांगितले. नुकसानीबाबत कंपन्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. सर्व कंपन्यांच्या तक्रारीनंतरच एकूण किती नुकसान झाले याचा आकडा समोर येऊ शकेल. लहान-मोठ्या मिळून ७० कंपन्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.