११६ ग्रा.पं.मध्ये निवडणुकांचा बार
By Admin | Published: July 14, 2015 12:44 AM2015-07-14T00:44:29+5:302015-07-14T00:51:16+5:30
बीड : जिल्ह्याकडे पावसाने डोळे वटारले आहेत त्यामुळे शेती-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती आहे
बीड : जिल्ह्याकडे पावसाने डोळे वटारले आहेत त्यामुळे शेती-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावकीचे राजकारण तापले आहे. पावसाअभावी दुष्काळ असला तरी आखाड्यात उडी घेऊन हाबूक ठोकणाऱ्यांचा मात्र सुकाळ आहे. ११६ ग्रामपंचायतींमध्ये २८८७ अर्ज आले असून, सोमवारी रात्री उशिरापर्यंत छानणीची प्रक्रिया सुरू होती.
एकट्या बीड तालुक्यात २७ ग्रामपंचायतींसाठी ४३४ इच्छुकांची संख्या आहे. पैकी १३ अवैध तर ४२१ वैध ठरले. केज तालुक्यात अर्ज दाखल केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तेथे ६२२ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. इतर तालुक्यांच्या अर्जांची छानणी उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावागावात राजकीय खलबते सुरू झाली आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असून, जिल्हास्तरावरील नेत्यांची वर्दळ वाढली आहे. ऐन दुष्काळी स्थितीत होत असलेल्या या निवडणुकांमध्ये उमेदवारांचे बजेट ढासळले आहे. मतदारांची मनधरणी करीत आश्वासनांची बोळवण सुरू आहे. (प्रतिनिधी)