दसरा मेळाव्याला मराठा समाजासह बारा बलुतेदारही येणार, पुढील घोषणा तिथेच: मनोज जरांगे
By बापू सोळुंके | Published: October 1, 2024 02:19 PM2024-10-01T14:19:41+5:302024-10-01T14:20:28+5:30
आरक्षण न दिल्यास नाईलाजाने राजकारणात यावे लागेल; मराठा नेते मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर: नारायणगड येथे दसरा मेळाव्याला लाखो लोक येणार आहेत. या मेळाव्याला मराठा समाजासह बारा बलुतेदार समाज येणार आहे. मेळाव्याची तयारी सुरू असल्याचे मराठा नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. मेळाव्यात उमेदवार उभे करण्याची घोषणा करणार का, या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला १२ ऑक्टोबर रोजी मिळेल असेही त्यांनी नमूद केले. तसेच गरीब मराठा समाजासाठी मी आरक्षण मागतोय, मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे उपलब्ध आहे, आचारसंहितेपूर्वी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देत नसाल तर,सरकार स्वत:च्या पायावर दगड पाडून घेईल, नाईलाजाने मला राजकारणांत यावे लागेल असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला दिला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, काल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी पुराव्यांची संख्या वाढविल्याचे सांगितले. आम्ही सरसकट कुणबी आरक्षण मागतो आहे. पुरावे मिळवूनही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, असे दिसते. मात्र मराठ्यांना डावलून तुम्ही निवडणुक लढत असाल तर ही तुमची मोठी चुक असेल. जातीच्या विरोधात जाणारी कथित अभ्यासकांची टोळी एकत्र येत असेल तर समाज बघेल, जातीशी बेईमानी करणारे काल बैठकीला होते, असेही जरांगे यांनी नमूद केले.
आपल्याकडे येणाऱ्या नेत्यांची मजा घेतोय
आपल्या भेटीला येणारे सत्ताधारी आणि महाविकास आघाडीचे नेते हे छायाचित्र आणि व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर टाकत असतात. यातून जरांगे त्यांच्यासोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न ते करतात, त्यांना तुम्ही काय संदेश देणार असा सवाल केला असता ते म्हणाले, भेटायला येणाऱ्या नेत्यांना मी आडवू शकत नाही. मात्र, आपला कोणालाही पाठींबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांना समजणं सोपं नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजणं सोपं नाही.आता ते एखाद्याला सारथीवर तर कोणाला महामंडळावर घेतील. त्यांचे काम म्हणजे साखर कारखान्याशेजारी मुंगीपालन व्यवसाय करण्यासारखं आहे. मुंग्या कारखान्यातील साखर ओढून आणतील आणि ती साखर विकून आपण साखर सम्राट व्हायचं असे असल्याचे त्यांनी सांगितले.