विद्यापीठातील १,८१२ विद्यार्थ्यांना १२ कोटी २२ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 03:29 PM2019-04-27T15:29:04+5:302019-04-27T15:30:45+5:30
राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत सर्वाधिक अनुदान
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांमधून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी १,८१२ विद्यार्थ्यांना १२ कोटी २२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत हा निधी निश्चितच समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकार, राज्य सरकारकडून संशोधन, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. विविध ११ शिष्यवृत्तीअंतर्गत २०१७-१८ साली १,८१२ विद्यार्थ्यांना सर्वाधिक १२ कोटी २२ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय विद्यापीठ प्रशासनाकडून संशोधन करणाऱ्या गोरगरीब, शेतमजूर विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याचा आकडाही वेगळाच असल्याचेही डॉ.चोपडे यांनी सांगितले.
पीएच.डी.,एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी विद्यापीठातील ३५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. यासाठी ५ कोटी ९१ लाख ३२ हजार ५०० रुपये मंजूर झाले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील मौलाना आझााद राष्ट्रीय शिष्यवृृत्ती २१ विद्यार्थ्यांना मिळाली. यात ३ कोटी ५४ लाख ७९ हजार रुपये मिळाले. नेट-जीआरएफ शिष्यवृत्ती दोन विद्यार्थ्याला मिळाली आहे. यासाठी ३३ लाख ७९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. पोस्ट डॉक्टरेट शिष्यवृत्ती एका विद्यार्थ्याला मंजूर झाली आहे. यासाठी १६ लाख ८९ हजार ५०० रुपये मिळाले आहते.
याशिवाय गव्हर्नमेंट आॅफ इंडिया पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप ७८७ विद्यार्थ्यांना ८४ लाख ९८४ रुपये, २३ विद्यार्थ्यांना फ्रिशिपच्या माध्यमातून ४ लाख ३३ हजार, स्वधार शिष्यवृत्तीतून १२६ विद्यार्थ्यांना ६० लाख १० हजार २०० रुपये मिळाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती २५१ विद्यार्थ्यांना १७ लाख २० हजार ५९२ रुपये मिळाले. पंडित दीनदयाल उपाध्याय शिष्यवृत्ती ३४ विद्यार्थ्यांना १७ लाख रुपये, गव्हर्नमेंट आॅफ पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप ९२ विद्यार्थ्यांना मिळाली. त्यासाठी ६ लाख ४९ हजार ४३० रुपये मिळाले असल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळविण्याचे कौशल्य आहे. राष्ट्रीयस्तरावरील शिष्यवृत्ती मिळविण्यातही आपले विद्यार्थी आघाडीवर असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यात हे स्पिरिट मोठे
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांमधून मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. याशिवाय विद्यापीठ प्रशासन संशोधन करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांना आणि गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्याचे स्पिरिट मोठ्या प्रमाणात आहे.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू