बंद बँक खात्याचे धनादेश देऊन औरंगाबाद जिमखाना क्लबला १२ कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:54 PM2020-03-09T12:54:52+5:302020-03-09T14:08:46+5:30

सिटीचौक पोलीस ठाण्यात मुंबईच्या ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

12 crore fraud to the Gymkhana Club by giving a check of closed bank account | बंद बँक खात्याचे धनादेश देऊन औरंगाबाद जिमखाना क्लबला १२ कोटींचा गंडा

बंद बँक खात्याचे धनादेश देऊन औरंगाबाद जिमखाना क्लबला १२ कोटींचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देएफएसआय वरळीत दुसऱ्या ठिकाणी वापरलाकाम केलेले नसताना एस बँकेने ४१० कोटींचे कर्ज कसे दिले

औरंगाबाद : जालना रोडवरील औरंगाबाद जिमखाना क्लबच्या संचालकांची मुंबई येथील दोन खाजगी कंपन्यांनी झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम घेतल्याचे दाखवून कोट्यवधी रुपये घेतले. प्रकल्पात पैसे लावणाऱ्या मंडळींना परतफेड देण्याची वेळ आल्यावर तब्बल १२ कोटी १७ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात मुंबईच्या ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

कोट्यवधी रुपयांच्या या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद जिमखाना क्लबचे संचालक महेंद्र संपतराज सुराणा यांनी १९९५ मध्ये औरंगाबाद जिमखाना क्लबची स्थापना केली. २००९ मध्ये महेंद्र यांचे भाऊ सुरेंद्र यांनी सुराणा कन्स्ट्रक्शन वडाळा, मुंबई या फर्मची स्थापना केली. २०११ मध्ये कंपनीला मुंबईच्या आनंदनगर या झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम मिळाले. प्रकल्पासाठी लागणारा पैसा औरंगाबाद जिमखाना क्लबने सुराणा कन्स्ट्रक्शनला देण्यासाठी करार केला. २० कोटी रुपये देण्याचे करारात ठरले. त्यानुसार १३ कोटी ४४ लाख ४१ हजार रुपये वर्ग करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामासाठी सुराणा कन्स्ट्रक्शनने मुंबईच्या ओमकार  रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सला सोबत घेतले. सुराणा कन्स्ट्रक्शनने आपले १०० टक्के शेअर्स ओमकार  रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सला देईल, त्या मोबदल्यात १६५ कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यानंतर ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सने एस बँकेकडून ४१० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेण्यासाठी सुराणा डेव्हलपर्सची मालमत्ता गहाण ठेवली. कंपनीने झोपडपट्टी पुनर्विकासाचे कामच केले नाही.

विशेष बाब म्हणजे करारानुसार ठरलेली रक्कमही ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सने दिली नाही. त्यामुळे कंटाळून महेंद्र सुराणा यांनी २०१९ मध्ये न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक तथा आरोपी राजेंद्र मुलचंद वर्मा, गौैरव विष्णूकुमार गुप्ता, बाबूलाल मूलचंद वर्मा, कमलकिशोर गोकलचंद गुप्ता, राहुल मारू, मोहन सुब्रह्मणीयम यांनी तडजोड करण्याची तयारी दर्शविली. न्यायालयात आरोपींनी सुराणा यांना धनादेश दिले. त्यांनी दोन धनादेश बँकेत टाकले असता खाते बंद असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुराणा यांनी वकिलामार्फत न्यायालयाला ही बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने संबंधितांवर  फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश दिले. त्यानुसार सुराणा यांनी पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेला सर्व व्यवहारांची माहिती दिली. पोलिसांनी अभ्यास करून शनिवारी रात्री ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

एफएसआय वरळीत दुसऱ्या ठिकाणी वापरला
ओमकार रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या संचालकांनी आनंदनगर येथे झोपडपट्टी पुनर्विकासाचे अजिबात काम केले नाही. काम केलेले नसताना एस बँकेने ४१० कोटींचे कर्ज कसे दिले, याचे आश्चर्य वाटते. आरोपींनी आनंदनगर येथील एफएसआय वरळी येथील एका दुसऱ्याच इमारतीसाठी वापरले, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना महेंद्र सुराणा यांनी दिली.

२० कोटी रुपये : औरंगाबाद जिमखाना क्लबने करार सुराणा कन्स्ट्रक्शनसोबत २0११ मध्ये केला. त्यातील १३ कोटी रुपये देण्यात आले.

४१0 कोटी रुपये : मुंबईच्या ओमकार  रियलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सने येस बँकेकडून सुराणा डेव्हलपर्सची मालमत्ता गहाण ठेवून घेतले.

Web Title: 12 crore fraud to the Gymkhana Club by giving a check of closed bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.