घाटी रुग्णालयाला मिळणार यंत्रसामुग्रीसाठी १२ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:13 PM2019-01-17T21:13:51+5:302019-01-17T21:14:05+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी (राज्य कर्करोग संस्था) विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला गुरुवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी (राज्य कर्करोग संस्था) विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला गुरुवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली.
घाटी रुग्णालयासह शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी विविध यंत्रसामुग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) १८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. यामध्ये एकट्या घाटी रुग्णालयासाठी १० कोटींची मागणी करण्यात आली होती. यामध्ये ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. विभागीय आयुक्तालयात गुरुवारी झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे निधीसंदर्भात प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजन बिंदू, डॉ. वर्षा रोटे यांनी भेट घेतली. यावेळी अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. अतुल सावे, अभ्यागत समितीचे सदस्य राम बुधवंत उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांनी यंत्रसामुग्रीसाठी १२ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे या तिन्ही संस्थांच्या यंत्रसामुग्रीसाठी आता ६ कोटींऐवजी आता दुप्पट निधी म्हणजे १२ कोटींचा निधी मिळणार आहे. यावेळी विभागातील आरोग्य सेवांसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्याचेही अर्थमंत्री म्हणाले.
विविध यंत्रसामुग्री
विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीत घाटी रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय यांचा प्रत्येकी किती वाटा राहील, हे लवकरच स्पष्ट होईल. या निधीतून विविध विभागांसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची खरेदी होईल, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजन बिंदू यांनी सांगितले.