पानदरिबा गोडाऊनमध्ये उतरविलेला १२ लाख ८७ हजारांची सुगंधी तंबाखू, विदेशी सिगारेट पोलिसांनी केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:00 AM2019-06-20T00:00:56+5:302019-06-20T00:01:27+5:30
पानदरिबामधील एका गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, जप्त मालाची बाजारातील किंमत १२ लाख ८७ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबाद : पानदरिबामधील एका गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, जप्त मालाची बाजारातील किंमत १२ लाख ८७ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रेणिक सुरेश सुराणा (रा.मोतीकारंजा) आणि शेख आसीफ लाला शेख बाबा लाला (२८, रा. बुढीलेन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, पानदरिबा येथील चौधरी कॉम्प्लेक्समधील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेट विक्रीसाठी आणून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांना मिळाली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सिनगारे यांनी अन्नसुरक्षा अधिकारी आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चौधरी कॉम्प्लेक्सवर धाड टाकली. यावेळी तेथे विविध खोक्यांमध्ये गुटखा, विविध लेबल लावलेले आणि विनालेबलचे सुगंधी तंबाखंूचे खोके, विदेशी सिगारेटचा साठा आढळला. यात १० लाख २ हजार ६०० रुपये कि मतीची सुगंधी तंबाखू, पान मसाल्याचे सुमारे ४० मोठे खोके माल आहे. तर २ लाख ८५ हजार रुपये किमतीची पॅरिस स्पेशल फिल्टर सिगारेटची १३ मोठी खोकी, रुल्ली रिव्हर स्पेशल फिल्टर सिगारेटची ६ मोठी खोकी पोलिसांच्या हाती लागली. हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी, प्रशांत अजिंठेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, कर्मचारी शेख गफ्फार, समाधान सोनुने, सचिन शिंदे, मनोज पाटील, अभिजित गायकवाड यांनी सहभाग घेतला.
रसायनमिश्रित तंबाखू
जप्त करण्यात आलेली सुगंधी तंबाखू ही रसायन मिश्रणाने तयार केलेली असते. ही तंबाखू शरीरासाठी अपायकारक आहे. या तंबाखूच्या सेवनाने क र्करोग होण्याचा धोका असल्याने शासनाने अशी तंबाखू विक्री करण्यावर प्रतिबंध घातला आहे. असे असताना आरोपी हे चोरट्या मार्गाने तंबाखू आणून ठोकदराने टपरीचालक, दुकानदार यांना विक्री करीत होते. शिवाय विदेशी सिगारेटवर शासनाने ठरवून दिलेले धोक्याचे चित्र नसते. यामुळे अशा प्रकारच्या सिगारेट विक्रीवर बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी दिली.