विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे १२ लाख हडपले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:38 AM2020-08-13T02:38:19+5:302020-08-13T02:38:44+5:30
वारंवार दिल्या सूचना; पाच महाविद्यालये पैशाचा हिशोब देईनात
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्य शासनाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त भागातील ईबीसीधारक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते. ज्या महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसूल केले, अशा १०८ महाविद्यालयांना विद्यापीठ प्रशासनाने १ कोटी ६५ लाख ३१ हजार ४८५ रुपये एवढा निधी विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यासाठी दिला होता. यातील पाच महाविद्यालयांनी पाच वर्षे झाली तरी १२ लाख ९ हजार ९५० रुपयांचा निधी विद्यार्थ्यांमध्ये वितरित केला नसल्याची धक्कादायक बाब व्यवस्थापन परिषद सदमस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आली आहे.
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी विद्यापीठाला ४ कोटी ५४ लाख ५० हजार ४६० रुपये दिले होते. यातील १०८ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केले होते. हे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून दिला. मात्र, महाविद्यालयांनी हा निधी विद्यार्थ्यांमध्ये वाटप केला नाही .पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला तरी पाच महाविद्यालयांनी हिशोब सादर केला नाही.
या महाविद्यालयांचा आहे समावेश
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या पैशाचा हिशोब न देणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाने ८ हजार ६५० रुपये, पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयाने २ लाख ४४ हजार ५ रुपये, आष्टी येथील भगवान महाविद्यालय २ लाख ८२ हजार ५८० रुपये, तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाने ८१ हजार ३० आणि नळदुर्ग कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने २ लाख १९ हजार ९५० रुपये, अशा एकूण १२ लाख ९ हजार ७१५ रुपयांचा समावेश आहे.