बांधकाम विभागाचे मराठवाड्यासाठीचे १२ हजार ९३८ कोटींचे पॅकेज गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:59 AM2024-08-22T11:59:45+5:302024-08-22T12:04:29+5:30
आज बैठक : मंत्रिमंडळ बैठकीत विभागासाठी घोषित केले होते अनुदान
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विभागासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून ११ महिने झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे त्यावर काहीही निर्णय झाला नाही. शासनाने निवडणुकीनंतरही निर्णय घेतला नाही. या पॅकेजमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १२ हजार ९३८ कोटी ८५ लाखांचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यापैकी किती रक्कम दिली, याबाबत बांधकाम विभागाच्या प्रादेशिक विभागाकडे काहीही माहिती नाही. विभागाने शासनाकडे काय मागण्या केल्या, किती तरतूद केली, अध्यादेशात काय मिळाले, अर्थसंकल्पातील तरतुदींचे काय झाले, विभागाची देणी किती आहे. या सगळ्यांची जमवा-जमव करण्यासाठी बुधवारी मुख्य अभियंता कार्यालयाची धावपळ सुरू होती.
बांधकाम विभागाकडे काम नाही....
मराठवाड्यासाठी काय मागण्या मांडणार, निर्णय होणार, याबाबत सूत्रांनी सांगितले, तसे काही विशेष नाही. कोकण विभाग, महामंडळ, हॅम अंतर्गत रोडचे कामे होत आहेत. सगळ्या महामंडळांना बळकट केल्यामुळे बांधकाम विभागाकडे आस्थापना सांभाळण्यासह खड्डे बुजविणे, देखभाल दुरुस्ती करणे, ०३, ०४ अंतर्गत रस्ते बांधणे, इमारती बांधण्यापलीकडे फारसे काम शिल्लक राहिलेले नाही.
बांधकाम मंत्री आज शहरात
२२ ऑगस्ट रोजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बांधकाम विभागाच्या छत्रपती संभाजीनगर व नांदेड विभागांतर्गत आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर ते दुपारी ३ वाजता पुण्याला रवाना होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच येथे येऊन बैठक घेत आहेत. मंत्रिमंडळातील बैठकीत काय घोषणा केल्या, त्याबाबत चव्हाण काय चर्चा करतात, याकडे लक्ष आहे.