१२ वर्षांपासूनचा प्रश्न सुटला, सेवानिवृत्तीनंतर काही शिक्षकांना निवड श्रेणी लागू
By राम शिनगारे | Published: June 7, 2023 07:54 PM2023-06-07T19:54:54+5:302023-06-07T19:55:24+5:30
जि. प.च्या शिक्षकांना नोकरीस लागल्यानंतर १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येते.
छत्रपती संभाजीनगर : जि. प. शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बहुप्रतीक्षित निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय अखेर झाला आहे. ३८६ शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्यात आल्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा काढला. गोपनीय अहवाल न सापडल्यामुळे १८२ शिक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले. विशेष म्हणजे तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. या श्रेणीची वाट पाहत ३८६ पैकी ५० शिक्षक निवृत्तही झाले आहेत.
जि. प.च्या शिक्षकांना नोकरीस लागल्यानंतर १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यानंतर २४ वर्षे झाल्यावर निवड श्रेणी लागू करण्याचा नियम आहे. ही निवड श्रेणी लागू करण्यात यावी, यासाठी विविध शिक्षक संघटना अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. याविषयी विभागीय आयुक्तांकडे शिक्षक संघटनेच्या आग्रहामुळे बैठक झाली होती. त्यातही विभागीय आयुक्तांना शिक्षणाधिकाऱ्यांना निवड श्रेणी लागू करण्याचा तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कार्यवाही करण्यात आली आहे.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यास मान्यता दिल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी निवड श्रेणीत पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. ३८६ प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात आली. त्याचवेळी १८२ शिक्षकांचे गोपनीय अहवाल सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवड श्रेणीचा निर्णय प्रलंबितच राहिला आहे. ३८६ शिक्षकांना १२ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित १८२ शिक्षकांना निवड श्रेणी केव्हा लागू होते, हा विषय शिक्षक संघटनांमध्ये चर्चिला जात आहे.