कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी १२० कोटींचा निधी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:32+5:302021-06-22T04:05:32+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन समितीतून होणाऱ्या विकास कामांना यावर्षीही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ...
औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन समितीतून होणाऱ्या विकास कामांना यावर्षीही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आगामी वर्षासाठी ३६५ कोटींचा आराखडा मंजूर असून, त्यातील ३० टक्के म्हणजेच १२० कोटी रुपयांचा निधी कोरोनासाठी राखीव ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यातील १४ कोटी रुपये शासकीय रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या नियंत्रणासाठी २५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला होता. त्यात वाढ करून ३३ टक्के निधी राखीव केला गेला. यातून कोरोना केअर सेंटरसह घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपा आणि ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणा अद्ययावत करण्यात आल्या.
मार्च २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने यंदाही डीपीसीतील विकास कामांसाठी असलेल्या निधीतून ३० टक्के निधी कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या महिनाभरात या निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि घाटीसाठी १४ कोटींचा निधी दिला आहे.
लाट टळल्यास विकासकामे होतील
डीपीसीतील मंजूर विकास कामांचे प्रस्ताव स्थगित ठेवून ३३ टक्के निधी कोरोना नियंत्रणासाठी गेल्यावर्षी खर्च केला. नोव्हेंबर २०२० पासून विकास कामांना निधी देण्यास सुरुवात झाली. जर तिसरी लाट आली नाहीतर यंदाही गेल्यावर्षी प्रमाणे निधीचे वितरण होईल, असे सूत्रांनी सांगितले.