औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 12:23 PM2021-09-11T12:23:00+5:302021-09-11T12:26:57+5:30
Rain In Aurangabad : यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५३ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीने ( Heavy Rainfall in Aurangabad ) घाला घातला. ७ हजार ५७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत महसूलचे पथक पोहोचले आहे. २ लाख ८७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान केले आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक किती ठिकाणी नुकसान झाले, याच्या अंतिम अहवालावरच नुकसान भरपाई निश्चित होणार आहे.
सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होत असून मागील दोन वर्षांत ६०० कोटींच्या आसपास नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर चार महिन्यांनी उशिरा ती मदत शेतकऱ्यांचा खात्यावर आली होती. यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे. अप्पर तहसील अंतर्गत २२ टक्के, औरंगाबाद तालुक्यात ६ टक्के, पैठण ३, वैजापूर ६, कन्नड ४, खुलताबाद ९, सिल्लोड २२ तर सोयगावमध्ये १६ टक्के पंचनामे झाले आहेत.
जिल्ह्यात १२० टक्के पाऊस
जिल्ह्यात आजवर १२० टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ९९ टक्के, पैठण १३८, गंगापूर ११२, वैजापूर १३४, कन्नड १४३, खुलताबाद ११८, सिल्लोड १४३, सोयगाव ११९ तर फुलंब्रीत ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पैठण, कन्नड, वैजापूर खुलताबाद भागात जास्त पाऊस झाला आहे.
नुकसानग्रस्त तालुक्यांचा आकडा असा
तालुका शेतकरी बाधित क्षेत्र
अप्पर तहसील औरंगाबाद ४४२६- ३१०४ हेक्टर
औरंगाबाद ९८५१ - ६८९६ हेक्टर
पैठण ७५४३२ - ३२०२० हेक्टर
फुलंब्री ०००० - ००००० हेक्टर
वैजापूर ३६८७३ - १६०९९ हेक्टर
गंगापूर ०००० - ००००० हेक्टर
कन्नड ८१६०२ - ७८३११ हेक्टर
खुल्ताबाद ३१६७२ - ११३४० हेक्टर
सिल्लोड ४५७८५ - १३६४८ हेक्टर
सोयगाव १८४५ - ६२३.५ हेक्टर
एकूण २८७४८६ - १६२०५३ हेक्टर