औरंगाबादमधील बारा हजार नागरिकांनी करून घेतली चारित्र्य पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:29 PM2018-12-01T17:29:57+5:302018-12-01T17:38:07+5:30
आॅनलाईन अर्ज केल्यास नागरिकांना अवघ्या चार ते पाच दिवसांत त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त होतो.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या १० हजार ३७ आणि ग्रामीण भागातील दोन हजार नागरिकांनी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी केवळ शंभर रुपये शासनाचे शुल्क असून, आॅनलाईन अर्ज केल्यास नागरिकांना अवघ्या चार ते पाच दिवसांत त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त होतो.
पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात विविध बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्या कामगार अथवा अन्य कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अथवा नाही, याबाबत खात्री करून घेतात. त्याकरिता कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त कार्यालयाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागवून घेतात. शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही गोपनीय पद्धतीने चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस विभागाकडून मागविला जातो. शिवाय रिक्षाच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
यावर्षी १ जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत शहरातील तब्बल १० हजार ३७ नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडून चारित्र्य पडताळणी करून घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. शिवाय पासपोर्ट (पारपत्र) तयार करण्यासाठी आणि एस.टी.तील वाहक पदासाठी लागणारा बॅच काढण्यासाठीही चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता असते. यामुळे असा पडताळणी अहवाल मागविणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
आॅनलाईन अर्ज उपलब्ध
चारित्र्य पडताळणी करण्यासाठी नागरिकांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज सादर करता येतो. चारित्र्य पडताळणीसाठी शंभर रुपये शुल्क असून हे चलन स्वरूपात आॅनलाईन पद्धतीने अथवा आॅफलाईन स्वरूपातही जमा करता येते. शिवाय जेव्हा एखाद्या उमेदवाराची निवड शासकीय नोकरीसाठी होते. तेव्हा त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी संबंधित विभागाकडून परस्पर केली जाते. तेव्हा त्यासाठी कोणतेही शुल्क उमेदवाराला भरावे लागत नाही.
ग्रामीणमध्ये २ हजार नागरिकांनी केली चारित्र्य पडताळणी
ग्रामीण भागातील सुमारे दोन हजार नागरिकांनी स्वत:ची चारित्र्य पडताळणी करून घेतल्याचे समोर आले. ग्रामीण पोलिसांकडून आॅनलाईनची सुविधा उपलब्ध नाही, यामुळे नागरिकांना चारित्र्य पडताळणीसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागतो.
चारित्र्य पडताळणी अहवाल कशासाठी
- पासपोर्ट (पारपत्र) काढताना
- सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी
- रिक्षाचे परमिट काढण्यासाठी
- स्वत:वरील दाखल गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी